
Search Results
73 results found with an empty search
- ‘रक्षकांना राखी’ : हेरिटेज स्कूलचा अनोखा रक्षाबंधन सोहळा
पौड, ता. पुणे – भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण रक्षाबंधन यंदा हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलने अनोख्या उपक्रमातून साजरा केला. शाळेच्या विद्यार्थ्यांनी पौड पोलिस स्टेशनला भेट देऊन समाजाचे खरे ‘रक्षक’ असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मनगटावर राखी बांधत त्यांचा सन्मान केला. या विशेष कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या प्राचार्या डॉ. रेणू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाळेने पोलीस स्टेशनला भेट देऊन विद्यार्थ्यांना कायदा अंमलबजावणी, फौजदारी न्यायव्यवस्था आणि समाजरक्षण याबाबत प्रत्यक्ष जाणून घेण्याची संधी दिली. विद्यार्थ्यांनी विविध विभागांची पाहणी केली, एफआयआर नोंदणीची प्रक्रिया शिकलो, तसेच गुन्हेगारी प्रतिबंधक उपायांबद्दल अधिकाऱ्यांकडून माहिती मिळवली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष गिरीगोसावी, सहाय्यक पोलीस अधिकारी श्रीमती अनिता रवळेकर, तसेच पोलीस कॉन्स्टेबल श्री. मनोज कदम, श्री. वैभव सुरवसे, श्री. मंगेश कदम, श्री. निवास जगदाळे, श्री. श्रीकृष्ण पोरे, श्री. बाबा पाटील, श्री. संतोष गायकवाड आणि श्री. विजय ओंबासे यांची विद्यार्थ्यांशी उत्स्फूर्त चर्चा झाली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मुळशी तहसीलदार श्री. विजयकुमार चोबे यांना भेटण्याची संधीही मिळाली. त्यांनी आपल्या जीवनप्रवासातील प्रेरणादायी क्षण सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रक्षाबंधनाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ आनंदोत्सव नव्हता, तर एक मौल्यवान शिकण्याचा अनुभव ठरला. शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. कृष्णा भिलारे, सचिव श्रीमती संगीता भिलारे, संचालक श्री. कुणाल भिलारे आणि श्रीमती यशस्विनी भिलारे यांनी पोलिस विभागाच्या नि:स्वार्थ सेवेसाठी आणि समाजरक्षणासाठी मनःपूर्वक आभार मानले.
- तिसरा राज्यस्तरीय श्रावणधारा काव्यमहोत्सव ओतूर येथे उत्साहात संपन्न
'तिसरा राज्यस्तरीय श्रावणधारा काव्यमहोत्सव २०२५' व 'पुस्तक प्रकाशन सोहळा' अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर येथे रविवार दि.१० ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उदघाटन मा. जि. प. सदस्य मोहितशेठ ढमाले व मा. जि. प. सदस्य अंकुशशेठ आमले यांनी शिवप्रतिमेचे पूजन करून व वृक्ष पूजन करून केले. प्रमुख पाहुणे म्हणून अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे, मराठी विभाग प्रमुख डॉ. वसंत गावडे आणि ओतूरच्या सरपंच डॉ. छाया तांबे उपस्थित होते. महाराष्ट्र गीताने आणि मराठी भाषा संवर्धन प्रतिज्ञा वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. अण्णासाहेब वाघिरे विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविक राजेश साबळे यांनी तर पाहुण्यांच्या स्वागतासाठी मनोगत प्रा. सुरेश डुंबरे यांनी व्यक्त केले . याप्रसंगी करंजाळे, ता. जुन्नर येथील जिल्हा परिषद शाळेच्या तीन विद्यार्थ्यांनी त्यांच्या कवितांचे वाचन केले. काव्य सादरीकरणामध्ये राज्यभरातील १०० कवी आणि कवयित्रींनी सहभाग घेतला होता. उत्तम सदाकाळ, यशवंत घोडे व शोभा गवांदे या ज्येष्ठ साहित्यिकांनी काव्य वाचन स्पर्धेचे परीक्षण केले. त्यांमधून सर्वोत्कृष्ठ ठरलेल्या व सहभागी साहित्यिकांचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. निवृत्ती महाराज कानवडे, संगमनेर (प्रथम), गौतम वाघमारे, संगमनेर (द्वितीय), शब्द स्वरा मंगरूळकर, मंगरूळ पारगाव, पुणे (तृतीय), नवनाथ सरोदे आंबी दुमाला, संगमनेर (चतुर्थ) आणि देवेंद्र गावंडे, जि. अकोला (पाचवा) हे काव्य स्पर्धेचे विजेते ठरले. या काव्य महोत्सवात राजेश साबळे यांच्या 'अस्तित्व,' प्रा. सुरेश डुंबरे यांच्या 'वेदनेच्या गर्भकळीतून,' डॉ. प्रवीण डुंबरे यांच्या 'उनाड पाऊस' व महोत्सव समितीच्या 'श्रावणधारा भाग - २' या काव्य संग्रहांचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राजेश साबळे ओतूरकर, डॉ. खं. र. माळवे, प्रा. सुरेश गे. डुंबरे, डॉ. प्रवीण डुंबरे हे जेष्ठ साहित्यिक उपस्थित होते. संजय गवांदे, प्रा. नागेश हूलवळे यांनी या संपूर्ण काव्य महोत्सवाचे निवेदन केले. विश्वविक्रमी रांगोळीकार सौ. हर्षा काळे यांच्या मनोवेधक रांगोळीने महोत्सवासाठी आलेल्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रणजित पवार यांनी आलेल्या सर्व साहित्यिकांचे आभार मानले आणि पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
- TED-Ed Student Talks ऑगस्ट २०२५ – तरुण आवाजांसाठी विचारांची जागर
पुणे, भारत — ३ ऑगस्ट २०२५ रोजी पुण्यामध्ये पार पडलेल्या TED-Ed Student Talks 2025 कार्यक्रमाने सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि सामूहिक सहभागाचा सुंदर संगम घडवून आणला. या कार्यक्रमाचे आयोजन आणि मार्गदर्शन वीरेंद्र निर्मलकर व पूजा टलेसरा भंडारी यांनी केले. या दिवसभर चाललेल्या कार्यक्रमात ८० पेक्षा अधिक सहभागी – विद्यार्थी वक्ते, कलाकार, विशेष अतिथी, स्वयंसेवक आणि संस्थात्मक भागीदार सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना आपले विचार मांडण्यासाठी एक वैश्विक व्यासपीठ देण्यात आले, ज्यातून नेतृत्व, नवकल्पना आणि संवेदनशीलता यांचे दर्शन घडले. 🎙️ ३२ विद्यार्थी, ३२ विचार, अनंत शक्यता कार्यक्रमात ३२ TED-Ed विद्यार्थी वक्त्यांनी ३ ते ७ मिनिटांचे TED-शैलीतील विचारप्रवण भाषण सादर केले. या सत्रात Victorious Kidss Educare, खराडी येथील १७ विद्यार्थी होते, तसेच सिंगापूर, अमेरिका आणि दुबई येथूनही विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विषयांमध्ये मानसिक आरोग्य, टिकाऊपणा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, संगीत थेरपी, मैत्री, लवचिकता आणि डिजिटल व्यसनाधीनता अशा अनेक जिव्हाळ्याच्या विषयांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी माहितीच्या पलिकडे जाऊन, अंतर्मुख विचार आणि सृजनशील दृष्टिकोन सादर केला. 🔆 प्रमुख विद्यार्थ्यांचे विषय: • आरव बालोदा – Behind Every Word is a World • आरजू रामावत – Offscript • अभिजीत तावरी – Is Your Screen Stealing Your Life? • अगस्त्य दुबे – Are We Hypocrites? • अमाया गावले – Books: The Brain’s Best Friend! • अपुर्विका कुमार – The Invisible Price Tag of AI • अर्कया जायस्वाल – React Mindfully, Respond Powerfully • अयान बैरागी – Everyone Deserves a Digital Chance • अयांश निकोले – When the Sky Started Helping Us • आयुष नायक – You Are the Actor, Not the Character • दर्श मेहर – Embracing Change: From Jet Lag to Joy • गार्गी गोलांडे – The Trap That Looks Like Fun • गर्व भंडारी – Discover the Power of Friendship • कर्तिकी अग्रवाल – Dance & The Dinosaurs • कियोना कुलश्रेष्ठ – Melodies that Mend • केशो सिंह अहलुवालिया – Escape Traffic Jams, Without Toast • खुशी बापना – Jeans: The Real Drama Queen! • ख्याती कपूर – Music is My Best Friend • मीर सालगर – The Trap of Screen Addiction • मायरा आल्वारेस – Our World - Let’s Keep It Clean • निजाल अब्दुल्ला – The Truth About Self-Care • पूजा वायल – From Agarbatti To Aerospace • रीत शेजूल – Is Your Brain Tricking You Everyday? • ऋतिशा महामुनी – The Trap of “Tomorrow” • रोहन एडलाबादकर – Mechanical Mangrove • शताक्षी बारबडे – The Power of Movement • श्रेय मोंडल – The Mirror and the Silence • श्रेय शेजूल – Move to Feel, Not to Fit • स्वराज धर्माधिकारी – Progress Over Perfection • तन्वी मिश्रा – Resilience Isn’t Magic — It’s Mindset • यशना भंडारी – Is Loneliness Secretly Killing You? • योहन रकीबे – AI For A Greener Tomorrow 🎶 मन हेलावणाऱ्या कलापरफॉर्मन्स विद्यार्थ्यांच्या भाषणांसह १० सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांचे मन जिंकले: अविका सोमण्णा, धृती पवार, निखित नल्लमल्ली, प्रशांत हर्णावळ, पूर्वा माळी, श्रुती साकोरे, सिद्धार्थ शुक्ला, वैष्णवी माळी, विनया क्षीरसागर. 🏅 मान्यवरांचे सन्मान कार्यक्रमात खालील प्रमुख अतिथींचा सन्मान करण्यात आला: • मुख्य अतिथी: पूजा टलेसरा भंडारी, सारदा घोष • कीनोट वक्ते: इरा घोष, विशाल शेवळे • विशेष अतिथी: रेनीश मॅथ्यू, अमित गोडसे, बिजॉय पलिस्सेरी, डॉ. अनिंदिता चौधरी, नव्या सोमण्णा 📚 विचारांची पुस्तके – एक खास टप्पा या कार्यक्रमात प्रत्येक TED-Ed वक्त्यासाठी खास वैयक्तिकृत पुस्तके प्रकाशित करण्यात आली — त्यांची कल्पना, वाटचाल आणि प्रगतीचे प्रतीक. 💪 कार्यक्रमाचा कणा – टीम व स्वयंसेवक संपूर्ण आयोजन यशस्वी करण्यासाठी समर्पित टीम: श्वेता मुनेगौडा, वसुंधरा सिंग, आरिन जुनागडे, अदिती नवाळे, जान्हवी बर्दाले, नेहांश काकोनिया स्वयंसेवक: ऐशा लोबो, आकृती निर्मलकर, दीपा यादव, हिमप्रवा पांडा, किरण भोरडे, महेश मोहिते, मनमथ मार्कुंडे, मनोज नैलवाल, प्रज्ञा मुंढे, रेचेल प्रसांगी, शकील शेख, शुभम जामनिक, सोहेल खान, स्वराली पाटील, उत्कर्ष कालिंकर, यश पारसे इत्यादी सहकार्य करणारे संस्थात्मक भागीदार: Victorious Kids Educares, Leadership Demystified, VSPEAK Institute, Anan Cohorts, Stay Featured, Ridaan Array, Rhythm Music Academy, Neel Writes, Design Mediaa, Alari Nrityalaya 🗣️ मार्गदर्शकांचे विचार "आपण अशा पिढीला घडवूया जी केवळ टाळ्यांसाठी नव्हे, तर विचारांसाठी उभी राहील. दबाव नव्हे, व्यासपीठ द्या. स्क्रिप्ट नव्हे, स्पेस द्या. केवळ शब्द नव्हे, आवाज घडवा." — पूजा टलेसरा भंडारी "TED-Ed Student Talks माझ्या हृदयात अगदी खास स्थान आहे. हे केवळ एक स्टेज नाही, तर विद्यार्थ्यांना स्वतःला शोधण्याचं, मांडण्याचं आणि जगासमोर उभं राहण्याचं ठिकाण आहे." — वीरेंद्र निर्मलकर, आयोजक व TED-Ed मार्गदर्शक ℹ️ TED-Ed Student Talks विषयी TED-Ed Student Talks हे TED-Ed या TED च्या शैक्षणिक विभागाचे वैश्विक कार्यक्रम आहे, जे ८–१८ वयोगटातील विद्यार्थ्यांना "Ideas Worth Spreading" शोधण्याची, लिहिण्याची आणि सादर करण्याची संधी देते. हे कार्यक्रम एक प्रशिक्षित शिक्षक किंवा फॅसिलिटेटरमार्फत चालवले जाते आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य, सर्जनशीलता, सहकार्य आणि विचार करण्याची क्षमता वाढवते. 📸 फोटो, व्हिडिओ किंवा मुलाखतीसाठी संपर्क करा: 📧 info.vspeak@gmail.com | 📱 +91 63 5995 5995 जाहीरकर्ता: V-Speak Institute, पुणे (TED-Ed Student Talks कार्यक्रमाच्या सहयोगाने)
- जेष्ठ अभिनेते अमोल पालेकर 'नाफा जीवन गौरव - २०२५ पुरस्कारने सन्मानित!
नॉर्थ अमेरिकन फिल्म असोशिएशन'च्या वतीने देण्यात येणाऱ्या 'नाफा जीवन गौरव पुरस्काराने' यंदा जेष्ठ अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर यांना गौरवण्यात आले. हिंदी, मराठी, बंगाली, कन्नड, मल्याळम भाषांतील चित्रपटांमध्ये आपल्या दर्जेदार आणि परिपक्व अभिनयाने रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या अमोल पालकरांच्या कार्याचा सन्मान अमेरिकेतील तमाम मराठी प्रेक्षकांच्या उपस्थिती सॅन होजेतील ‘द कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये २५ जुलै रोजी संपन्न झालेल्या ‘नाफा ग्लॅमरस फिल्म अवार्ड नाईट’ या भव्य आणि दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार आणि नाफाचे संस्थापक अभिजीत घोलप यांसह मराठी चित्रपटक्षेत्रातील अनेक दिग्गज कलावंत, प्रेक्षक उपस्थित होते. "भविष्यात 'नाफा'च्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये काम करण्याचे स्वप्नं पूर्ण होतील" असे गौरवोद्गार अभिनेते अमोल पालेकरांनी हा पुरस्कार स्वीकारताना काढले. या सोहळ्यात पुढे बोलताना सन्मानीय अमोल पालेकर म्हणाले, "माझा हा सन्मान केलात, गौरव केला याबद्दल नाफाचे, अभिजीत घोलप आणि तुम्हा सर्व रसिकप्रेक्षकांचे मनापासून आभार. काही वर्षांपूर्वी गौरी देशपांडेंच्या कथेवर बेतलेला सिनेमा करण्याची तयारी मी सुरु केली होती. त्या सिनेमामध्ये निकोल किडमन आणि अमिताभ बच्चन या दोघांना घेऊन मराठी सिनेमा बनविण्याचे माझे स्वप्न होते. आम्ही निकोल पर्यंत पोहचलो, त्याला ती पटकथा आवडली आणि त्याने तात्काळ होकारही दिला. मात्र हॉलिवूड मधील कोणत्याही एका स्टुडिओला सोबत घेण्याची अट घातली. या किचकट गोष्टीची कल्पना असल्याने तो विचार मी सोडून दिला. पण त्यावेळेला जर NAFA सारखी संस्था, असे कार्यकर्ते आणि अभिजित सारखी व्यक्ती असती तर तो प्रकल्प पुढे नेता आला असता. पण आता, NAFAच्या माध्यमातून अशी स्वप्नं पूर्ण होतील, अशी मला आशा आहे." जेष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांना हा पुरस्कार प्रदान करतेवेळी नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप म्हणाले, "यंदाचा नाफा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना विशेष आनंद होत आहे. पालेकरांच्या हळुवार, खुसखुशीत रोमँटिक भूमिकांनी आणि त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने तमाम भारतीय प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान आहे. जुबिलीस्टार अशीही त्यांची ओळख भारतीय चित्रपटसृष्टीत आहे, अश्या महान कलावंताचा हा सन्मान अमेरिकेतील तमाम मराठी रसिकांच्या हृदयातून, आपलेपणाने केला जात आहे. पालेकरांनी हा सन्मान स्वीकारून 'नाफा'चाच सन्मान वाढविला आहे. अमोल पालेकर हे प्रसिद्ध भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रकार आहेत. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत मोलाची भर घातली आहे. ते एक उत्कृष्ट अभिनेते म्हणून ओळखले जातात, तसेच त्यांनी अनेक यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. त्यांनी ललित कलांमध्ये शिक्षण घेतले आणि 'सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट' मधून पदवी मिळवली. त्यांनी सुरुवातीला चित्रकार म्हणून काम केले, पण नंतर अभिनयात पदार्पण केले. पालेकर यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'शांतता! कोर्ट चालू आहे!', 'गोलमाल', 'बातों बातों में', 'छोटी सी बात', ‘रजनीगंधा’, ‘चित्तचोर’, ‘घरौंदा’, ‘मेरी बीवीकी शादी’, ‘नरम-गरम’, ‘श्रीमान श्रीमती’, 'आक्रीत', 'बनगरवाडी’, 'ध्यासपर्व', 'कैरी', 'अनाहत', 'धूसर', 'थोडासा रूमानी हो जाय', 'पहेली' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्यांनी अभिनय केलेल्या सर्वच चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या आहेत. नाफाच्या फिल्म अवार्ड नाईटची सुरुवात झाली ती 'रेड कार्पेटवरील एन्ट्रीने. सर्वप्रथम स्वप्नील जोशी एका नव्या लूकमध्ये रेड कार्पेटवर अवतरला. त्याला पाहून प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्या वाजवून त्याचे स्वागत केले. त्यानंतर वैदेही परशुरामी, आदिनाथ कोठारे, अमोल पालेकर आणि संध्या गोखले, सोनाली कुलकर्णी तिच्या मुलीसह, अश्विनी भावे, सचिन खेडेकर, गजेंद्र अहिरे, महेश कोठारे, डॉ. मोहन आगाशे आणि मधुर भांडारकर यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांची एंट्री झाली. या सोहळ्यातील मनोरंजनपर कार्यक्रमात मराठी लोकनृत्याचे सादरीकरण पाहायला मिळाले आणि त्यानंतर कलाकारांना सन्मानचिन्हं देण्यात आली. अवधूत गुप्ते यांना प्रेक्षकांनी 'बाई बाई मनमोराचा' आणि 'आयुष्य हे' या गाण्यांची फर्माइश केली.
- निसर्ग सृष्टी वेलफेअर फाऊंडेशनतर्फे ध्वनी प्रदूषण नियंत्रणाविषयी जागरूकता कार्यक्रम
पुणे, १३ जुलै २०२५: निसर्ग सृष्टी वेलफेअर फाऊंडेशन, पुणे यांच्या वतीने दिनांक १२ जुलै २०२५ रोजी सकाळी ८ ते ९ या वेळेत कलावती दत्तात्रय कोतवाल हायस्कूल, हडपसर, पुणे येथे ध्वनी प्रदूषण नियंत्रणाविषयी जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जाधव यांनी फाऊंडेशनच्या टीमचे स्वागत करून केली. निसर्ग सृष्टी वेलफेअर फाऊंडेशनची ओळख आणि त्यांच्या कार्याची माहिती सौ. कुंभार यांनी उपस्थितांना करून दिली. फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. गरिमा कवठेकर यांनी ध्वनी प्रदूषण नियंत्रणाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी फाऊंडेशनद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा आणि भविष्यातील योजनांचा आढावा घेतला. या कार्यक्रमात : १८० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाला फाऊंडेशनचे व्यवस्थापक श्री. राजेंद्र कुलकर्णी उपस्थित होते. मुख्याध्यापिका सौ. जाधव यांनी या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल, असे नमूद करत फाऊंडेशनला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी सौ. पवार यांनी सर्वांचे आभार मानले. निसर्ग सृष्टी वेलफेअर फाऊंडेशन पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक कल्याणासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांनी फाऊंडेशनचे कौतुक केले. संपर्कासाठी: निसर्ग सृष्टी वेलफेअर फाऊंडेशन, पुणे www.nisargsrishti.org Email- nisarg.srishti@gmail.com Official no. 9423088707
- जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये जनजागृती कार्यक्रम
कासार आंबोली येथील हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘जागतिक लोकसंख्या दिना’निमित्त विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अतिरिक्त लोकसंख्येच्या परिणामांबाबत कविता, गाणी, पीपीटी प्रेझेंटेशन आणि भाषणे सादर करून समाजात जागरूकता निर्माण केली. कार्यक्रमात लोकसंख्यावाढीची कारणे, परिणाम आणि उपाय यांवर सखोल चर्चा झाली. विद्यार्थ्यांनी पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे विषयाची माहिती प्रभावीपणे मांडली. शाळेच्या प्राचार्या डॉ. रेणू पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबंधित प्रश्न विचारून त्यांची जागरूकता तपासली आणि या जनजागृती कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांनी प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन लोकसंख्या वाढीच्या समस्येविषयी आपली जाणीव दर्शवली. यावेळी ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ या शासकीय उपक्रमाची माहिती देण्यात आली. लोकसंख्येचा समतोल राखण्याचे महत्त्व आणि त्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला. कार्यक्रमाला शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. कृष्णा भिलारे, सचिव सौ. संगीता भिलारे, व्यवस्थापकीय संचालक श्री. कुणाल भिलारे, सौ. यशस्विनी भिलारे, प्राचार्या तसेच शिक्षक उपस्थित होते. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यात यशस्वी ठरला आणि लोकसंख्या नियंत्रणाच्या महत्त्वाविषयी महत्त्वपूर्ण संदेश दिला.
- "विठ्ठल नामाची शाळा भरली!" – हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्सव साजरा
मुळशी तालुक्यातील कासार आंबोली येथील हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल मध्ये दिनांक ४ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशीचा पारंपरिक आणि भक्तिभावपूर्ण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी आकर्षक फुलांनी सजवलेली पालखी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सजवण्यात आली. या पालखीचे पूजन व्यवस्थापन समितीच्या कु. समिधा भिलारे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. रेणू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीला फुलपुष्प अर्पण करत भाविकतेने पूजा संपन्न झाली. विद्यार्थ्यांची "पायी दिंडी" हा कार्यक्रम उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरला. "विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल" च्या घोषात पद्मावती मंदिर ते विठ्ठल मंदिर असा मार्ग पार करत दिंडी पुन्हा शाळेत परतली. पारंपरिक पोशाखातील विद्यार्थ्यांनी परिसर भक्तिरसात न्हावून निघाला. कार्यक्रमाची सुरुवात दमदार लेझीम आणि पारंपरिक नृत्याने झाली. सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी रिंगण सादर करत उपस्थितांची मने जिंकली. यानंतर पारंपरिक वेशभूषा, कीर्तन, अभंग गायन, भारूड, श्लोक पठण अशा विविध स्पर्धांनी साजरेपणात भर घातली. लहान मुलांसाठी तुळस सजावट व पालखी सजावटीच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व उपक्रमांत विद्यार्थ्यांचा सहभाग वाखाणण्याजोगा होता. शाळेच्या संचालक, व्यवस्थापक व मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा झालेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मनात सांस्कृतिक मुळे रुजवणारा ठरला. – प्रतिनिधी,हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल, कासार आंबोली, मुळशी
- “दाजी काका : प्रेम, प्रेरणा आणि आठवणींचा अमूल्य ठेवा”- डॉ प्रतिक मुणगेकर
दाजी काका... तुमचं जाणं अंतःकरणाचा ठाव घेऊन गेलं.. माझी आणि दाजी काकांची पहिली भेट 2011 साली झाली, जेव्हा त्यांनी आमच्या शाळेला ‘विवेकानंद पुरस्कार’ देण्यासाठी भेट दिली होती. त्याच वर्षी सलग तीन दिवस त्यांनी घेतलेली ‘महाभारत’वरील व्याख्यानमालिका ऐकण्याचा योग आला. त्या शब्दांनी श्रोत्यांच्या मनामध्ये जणू मंत्रच फुंकला होता—अप्रतिम, अवर्णनीय अनुभव! मग जवळजवळ आठ वर्षांनी, नंदिनी ताईंमुळे पुन्हा एकदा दाजी काकांच्या सान्निध्यात येण्याचा योग आला. त्या भेटीनंतर मात्र अनेकदा त्यांच्या सहवासाचा, ज्ञानस्पर्शाचा आणि मायेच्या उबदार सावलीचा अनुभव घ्यायला मिळाला. हे माझं भाग्यच म्हणावं लागेल. दाजी काकांनी माझ्या एका पुस्तकासाठी प्रस्तावनाही लिहिली. माझ्या प्रत्येक पुस्तकाला त्यांनी आनंदाने आणि पूर्ण उत्साहाने स्वीकारलं, कौतुक केलं, आणि भरभरून आशीर्वाद दिला. त्यांच्या घरी अनेकदा तासनतास बसून त्यांच्या विविध विषयांवरील चिंतन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विचारांची खोली ऐकण्याचा योग आला – किती भाग्यवान आहे मी! ठाण्यात एकदा त्यांच्या व्याख्यानाला गेलो होतो. मी त्यांच्या साठी एक भेटवस्तू आणली होती. व्यासपीठावर जाऊन त्यांना ती दिली आणि नमस्कार केला. तेव्हा त्यांनी सर्वांसमोर माझं कौतुक करत, “हा माझा शिष्य आहे,” असं जाहीर केलं. त्या क्षणात जो आनंद मिळाला, ती ऊर्जा, तो गौरव – तो क्षण कायमचा हृदयात कोरला गेला. केवळ चार दिवसांपूर्वी मी फिलिपिन्समध्ये कार्यसंदर्भात होतो. तेव्हा माझा जिवलग मित्र पियूष याचा व्हिडीओ कॉल आला. त्यातून कळलं की दाजी काकांची तब्येत थोडी नरम आहे. पण अशा अवस्थेतही त्यांनी माझी आठवण काढली होती, विचारलं होतं – “प्रतिक कधी येणार?” “तो आता कायमचा फिलिपिन्समध्येच राहणार का?” हे प्रेम, ही आपुलकी, ही काळजी… शब्द अपुरे पडतात हे व्यक्त करायला. त्यांनी मला भरभरून दिलं – प्रेम, मार्गदर्शन, आशीर्वाद… आणि मी त्यांच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकत नाही. किती आठवणी, किती प्रसंग… सगळं लिहावं तर शब्दही थकतील. दाजी काका, माझा साष्टांग नमस्कार तुम्हाला. तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, कायम राहतील याची खात्री आहे. आणि हो, तुम्ही सांगितलं होतं – “मराठीत पुस्तक लिही…” ती इच्छा मी पूर्ण करत आहे. लवकरच ते पुस्तक प्रकाशित होणार आहे… आणि ते संपूर्णपणे तुम्हाला समर्पित करतो. तुमचं प्रेम, शिकवण आणि आशीर्वाद – आयुष्यभराचं प्रेरणास्थान. इति लेखनसीमा (एक स्नेहबंध, एक ऋण, एक अमूल्य ठेवा...) -प्रतिक दाजी पणशीकर ह्यांच्याविषयी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वैचारिक विश्वात अढळ स्थान असलेले ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि वक्ते दाजी पणशीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांनी विविध वृत्तपत्रांमधून लिहिलेल्या लेखमालांनी महाराष्ट्राला समृद्ध वैचारिक ठेवा दिला. 'महाभारत एक सुडाचा प्रवास', 'कर्ण खरा कोण होता?', 'कथामृतम', 'कणिकनिती', 'स्तोत्र गंगा' (शंकराचार्यांच्या स्तोत्रांवर आधारित, दोन भाग), 'अपरिचित रामायण' (पाच भाग), 'गानसरस्वती किशोरी आमोणकर - आदिशक्तीचा धन्योद्गार' यांसारख्या त्यांच्या ग्रंथांच्या 30 हून अधिक आवृत्त्या प्रकाशित झाल्या. विषयाचा सखोल व्यासंग, चिंतनशीलता, स्पष्ट भूमिका आणि परखड विवेचन ही त्यांच्या लेखन आणि वक्तृत्वाची ओळख होती. त्यांचे थोरले बंधू प्रभाकर पणशीकर यांच्या 'नाट्यसंपदा' नाट्यसंस्थेचे व्यवस्थापक म्हणून दाजी पणशीकर यांचा मराठी साहित्य, संगीत, नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांशी घनिष्ठ संबंध आला. गेल्या 50 वर्षांतील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचे साक्षीदार असलेले हे महान व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या निधनाने मराठी सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
- डॉ. जयंत नारळीकर : बालमनाला अंतराळाची स्वप्नं दाखवणारा तारा -साहिल मुल्ला
रविवारची सकाळ असायची... दूरदर्शनवर एक गंभीर चेहरा, पण त्याच्या डोळ्यात चमक असायची – डॉ. जयंत नारळीकर. काय बोलायचे ते कळायचं नाही, पण त्यांचं बोलणं ऐकताना वाटायचं, आपल्याला काहीतरी फार मोठं, अद्भुत समजून घ्यायचं आहे. त्या वयात विज्ञान म्हणजे पुस्तकातलं काहीतरी कंटाळवाणं, पण नारळीकर सरांनी विज्ञानाला एका विलक्षण थरारात बदलून टाकलं. अंतराळ, तारे, कृष्णविवर, विश्वाचा विस्तार – या कल्पनाच आपल्यासाठी त्यांच्यामुळे अस्तित्वात आल्या. १९३८ साली कोल्हापूरमध्ये जन्मलेले जयंत विष्णू नारळीकर हे लहानपणापासूनच गणित आणि विज्ञानाची ओढ बाळगणारे. त्यांच्या वडिलांचाही अभ्यासू वारसा त्यांच्या रक्तात होता. पुढे त्यांनी केंब्रिज विद्यापीठात शिक्षण घेतलं आणि तिथेच त्यांनी महान खगोलशास्त्रज्ञ सर फ्रेड हॉयल यांच्यासोबत काम करत "Steady State Theory" निर्माण केली. आज साऱ्या जगात बिग बँग सिद्धांताला पर्याय म्हणून या विचाराला स्थान आहे. म्हणजेच ते फक्त वैज्ञानिक नव्हते, तर एक सिद्धांत निर्माते होते. विदेशात नाव कमवून भारतात परतल्यावर त्यांनी विज्ञानातील संशोधनाला नवी दिशा दिली. पुण्यात IUCAA – इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स – या संस्थेची स्थापना करून हजारो विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना दिशा दिली. ही संस्था केवळ संशोधन केंद्र नव्हे, तर विचारमंथन आणि विज्ञानप्रेमींसाठी उभारलेलं मंदिर आहे असं म्हणावं लागेल. त्यांचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे विज्ञानसाहित्य लेखन. त्यांनी मराठीत आणि इंग्रजीत अनेक पुस्तकं लिहिली – जी केवळ विद्वानांसाठी नाही, तर सर्वसामान्य वाचकासाठी होती. विज्ञान या विषयाची जडजंबाल भाषा त्यांनी इतकी सहज सोपी करून दिली, की लहान वाचक सुद्धा ‘क्वासार’, ‘ब्लॅक होल’ किंवा ‘टाईम डिलेशन’ सारख्या संकल्पना वाचून थक्क व्हायचे. त्यांची भाषणं, त्यांचे लेख, आणि दूरदर्शनवरील कार्यक्रम म्हणजे जणू एक विज्ञानयात्रा होती – समजून घेण्याची, विचार करण्याची, आणि प्रश्न विचारण्याची प्रेरणा देणारी. लहानपणापासून ज्यांनी ‘"तारे ’' मोजण्याच्या "पलीकडे जाऊन "विश्व कसं तयार झालं?", "आपण कोण?" हे प्रश्न विचारायला शिकवलं, अशा व्यक्तीचं आयुष्य आपल्याला किती तरी पटीने समृद्ध करून जातं. आम्हाला जेव्हा खगोलशास्त्राविषयी जिज्ञासा वाटू लागली, तेव्हा तिचं मूळ कुठे आहे हे लक्षात आलं – दूरदर्शनवर पाहिलेला एक झगमगता चेहरा आणि पुस्तकांच्या ओळींमधून आलेला तो आवाज – डॉ. जयंत नारळीकर. २० मे २०२५ रोजी ते आपल्यातून निघून गेले. पण त्यांनी रुजवलेली ज्ञानाची, विचारांची बीजं आज लाखो तरुणांमध्ये उगवलेली आहेत. आज विज्ञानात करिअर करणारे, अंतराळात स्वप्नं पाहणारे, संशोधनात रमणारे हे सारे विद्यार्थी त्यांच्या त्या एका प्रेरणादायी अस्तित्वाचे परिणाम आहेत. काही व्यक्तिमत्त्वं काळाच्या पलीकडची असतात. त्यांचं शरीर जातं, पण त्यांचे विचार, त्यांची ऊर्जा, आणि त्यांनी दिलेलं दृष्टीकोन जगात तग धरून राहतो. डॉ. नारळीकर हे असंच एक तेजस्वी ताऱ्यासारखं व्यक्तिमत्त्व होतं – त्यांनी विज्ञानाच्या आकाशात अंधार नसावा, म्हणून आपला प्रकाश आयुष्यभर देत राहिला. आज त्यांच्या आठवणीत डोळे पाणावतात, पण मन मात्र गर्वानं भरून जातं – की आपण अशा काळात जन्मलो, ज्या काळात डॉ. जयंत नारळीकर होते. विज्ञानातही संवेदनशीलता असते, हे त्यांनी शिकवलं. हे आयुष्यभर पुरणारं शिक्षण आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! प्रा. साहिल रज्जाक मुल्ला +91 9834627773
- विश्वकल्याण इंग्रजी माध्यमिक शाळेचा CBSE दहावी बोर्डात १००% निकालाचा दैदिप्यमान विजय!
पिंपरी-चिंचवडच्या चिखली येथील विश्वकल्याण इंग्रजी माध्यमिक शाळेने पुन्हा एकदा आपली शैक्षणिक उत्कृष्टतेची परंपरा कायम ठेवत CBSE दहावी बोर्ड परीक्षेत १००% यश मिळवले आहे! ही अभूतपूर्व कामगिरी शाळेच्या सर्वांगीण शिक्षण पद्धती, अत्याधुनिक सुविधा आणि शिक्षक-विद्यार्थी-पालक यांच्या एकजुटीच्या सामर्थ्याचे उत्तम उदाहरण आहे.शाळेची खास वैशिष्ट्येपिंपरी-चिंचवड परिसरात ‘अॅस्ट्रोनॉमी लॅब’ असलेली एकमेव शाळा म्हणून विश्वकल्याणने विशेष ओळख निर्माण केली आहे. अत्याधुनिक प्रयोगशाळा, विस्तीर्ण कॅम्पस आणि विविध सहली-कार्यक्रम यांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो. . शाळेच्या नेतृत्वाचा मोलाचा वाटाशाळेचे अध्यक्ष श्री. जितेंद्र मेहता, संचालिका सौ. नीलम मेहता आणि मुख्याध्यापिका डॉ. दीपाली शिरगावे यांच्या दूरदृष्टीने शाळेने शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. डॉ. शिरगावे यांनी CBSE मास्टर ट्रेनर म्हणून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कार्यशाळा आणि मानसिक-शैक्षणिक तयारीसाठी सत्रांचे आयोजन केले जाते.सर्वांगीण विकासाला चालनाविज्ञान, साहित्य, रोबोटिक्स आणि अंतराळशास्त्र यांसारख्या क्लब्समुळे विद्यार्थ्यांच्या आवडी आणि कौशल्यांना प्रोत्साहन मिळते. CBSE दहावी निकाल प्रेरणा पाटील – ९३.००% प्रियांशु जितेंद्रकुमार – ९१.२०% इश्वरी मेश्राम – ९०.६०% रणिता पी. हिरुगडे – ९०.४०% साक्षी राजपूरोहित – ८९.८०% वैष्णवी संजय सिंग – ८७.४०% विश्वाम पवन तिवारी – ८७.०४% या विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणि शाळेच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाला मनापासून सलाम! शाळेच्या नेतृत्वाचा मोलाचा वाटाशाळेचे अध्यक्ष श्री. जितेंद्र मेहता, संचालिका सौ. नीलम मेहता आणि मुख्याध्यापिका डॉ. दीपाली शिरगावे यांच्या दूरदृष्टीने शाळेने शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. डॉ. शिरगावे यांनी CBSE मास्टर ट्रेनर म्हणून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कार्यशाळा आणि मानसिक-शैक्षणिक तयारीसाठी सत्रांचे आयोजन केले जाते.सर्वांगीण विकासाला चालनाविज्ञान, साहित्य, रोबोटिक्स आणि अंतराळशास्त्र यांसारख्या क्लब्समुळे विद्यार्थ्यांच्या आवडी आणि कौशल्यांना प्रोत्साहन मिळते. अॅस्ट्रोनॉमी लॅबसारख्या अत्याधुनिक सुविधा विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या भविष्यासाठी सज्ज करतात. संपर्कासाठी माहिती शाळेच्या प्रवेशासाठी संपर्क साधा:फोन: ७२४९६७२५९३ वेबसाइट: www.vishwakalyanschool.in CBSE संलग्नता क्रमांक: ११३०७९६ विश्वकल्याण इंग्रजी माध्यमिक शाळा विद्यार्थ्यांना ज्ञान, मूल्ये आणि आत्मविश्वासाने सक्षम बनवण्यासाठी कटिबद्ध आहे. हा यशस्वी प्रवास पाहून प्रत्येकाला अभिमान वाटतो!
- हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलचे सीबीएसई बोर्ड परीक्षेत सुयश
कासार आंबोली तालुका मुळशी येथील ज्ञानदीप शिक्षण संस्था संचलित हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सीबीएससी बोर्ड परीक्षेत उज्वल यश मिळवले आहे शाळेचा निकाल 98 टक्के लागलेला आहे सीबीएससी बोर्डाचा दहावीचा निकाल नुकता जाहीर झाला त्यामध्ये शाळेतील राजन कुंभार 97% , सुजल हेरकर 94.4% मयुरेश पाटील 85.4% ,नील राऊत 85.2%, अनुष्का भोसले 83.4% मानसी शिंदे 77.2% ,सानवी सावंत 77%, संचित नखाते 75.8%, वेदांत राऊत 75.6%, समीक्षा वाकोडे 75.2%, असे गुणानुक्रमे 10 क्रमांक पटकावले . विद्यार्थी केंद्रीय शिक्षण पद्धती, अनुभवी व तज्ञ शिक्षक, सुसज्ज प्रयोगशाळा,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम व आधुनिक शिक्षण पद्धती यामुळे शाळेने यापूर्वी दोन वेळा 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' उपक्रमा अंतर्गत तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक पटकावले आहेत. तसेच 'राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार' मिळाला आहे. यंदा सीबीएसईच्या दहावी बोर्डामध्येही विद्यार्थ्यांनी विविध विषयात 90 पेक्षा जास्त गुण मिळवलेले आहेत. राजन कुंभार याने हिंदी मध्ये 100 पैकी 100 घेऊन एक उच्चस्थान मिळवले आहे.त्याला गणित विषयात 99 , इंग्लिश मध्ये 98, विज्ञान मध्ये 94, समाजशास्त्र मध्ये 94 गुण मिळालेले आहेत. विद्यार्थी, शिक्षक पालक व व्यवस्थापन या सर्वांच्या एकजुटीने हे संपादन करणे शक्य झाले आहे,असे प्राचार्य डॉ. रेणू पाटील यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या सर्वोत्तम यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा भिलारे, सचिव संगीता भिलारे , संचालक कुणाल भिलारे, कार्यकारी प्रशासकीय व्यवस्थापिका यशस्विनी भिलारे, प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांचे , शिक्षकांचे व पालकांचे कौतुक केले आणि आणि सर्व विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
- दुःख – एक विदारक सत्य : मृत्यूवर एक नव्या दृष्टीकोनातून चिंतन -डॉ. प्रतिक मुणगेकर
"दुःख एक विदारक सत्य आहे." या वाक्याचा खरा अर्थ तेव्हाच उमजतो, जेव्हा एखादी आपली जवळची व्यक्ती अचानकपणे आपल्या आयुष्यातून कायमची निघून जाते. त्या एका क्षणात काळ स्तब्ध होतो, मन शून्य होतं, आणि एक शब्दही उच्चारायची ताकद राहत नाही. मृत्यू म्हणजे केवळ एका व्यक्तीचा अंत नव्हे, तर त्याच्याशी असलेल्या असंख्य आठवणी, अपूर्ण संभाषणं, आणि न संपलेल्या नात्यांचा शांत विस्फोट असतो. अनेकदा आपण मृत्यूला ‘शेवट’ म्हणतो, पण खरे पाहता मृत्यू म्हणजे एक संक्रमण आहे – एका अवस्थेतील दुसऱ्या अवस्थेकडे नेणारा गूढ प्रवास. मृत्यू ही एक अशा प्रकारची अनुपस्थिती आहे, जिथे त्या व्यक्तीचं अस्तित्व प्रत्येक क्षणात अधिक ठळकपणे जाणवतं. तो आपल्यात नसतो, पण त्याचं असणं सतत आपल्या विचारांमध्ये, स्वप्नांमध्ये आणि आठवणींच्या धूसर छायेत वावरत राहतं. मृत्यूचा अनुभव म्हणजे फक्त रडणं, हरवणं किंवा विरह नव्हे – तो आत्म्याला हलवणारा आणि विचारांचं मूळच बदलणारा अनुभव असतो. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, त्यांचं अस्तित्व आपल्यासाठी इतकं गृहित धरलेलं असतं की, त्यांच्या जाण्याने आपण आपलं अर्धं आयुष्यच हरवतो, असं वाटतं. पण खरंतर, त्यांची अनुपस्थितीच आपल्याला त्यांच्या खरी उपस्थितीची जाणीव करून देते. दुःख ही केवळ भावना नसते – ती एक प्रक्रिया असते. ती आपल्याला अंतर्मनातल्या खऱ्या स्वरूपाशी भेट घडवते. दुःख म्हणजे शब्दात न मांडता येणारी व्यथा – जी डोळ्यांतून अश्रूंमधून नाही, तर आत्म्यातून प्रकट होते. त्या प्रक्रियेत आपण हळूहळू समजून घेतो की, माणूस फक्त शरीराने नसतो, तर त्याच्या विचारांनी, कृतींनी आणि स्मृतींनी आपल्या आयुष्यात सतत जिवंत असतो. मृत्यू नातं तोडत नाही, ते फक्त त्याचं स्वरूप बदलतं. तो संवाद बंद करत नाही, तो शब्दांशिवाय नवा संवाद सुरू करतो. आपण त्या व्यक्तीशी मनात बोलतो, त्यांच्या आठवणींना स्पर्श करतो, आणि अनेकदा त्यांच्या शिकवणीतून नव्याने जगायला शिकतो. कधी वाटतं – आपण का रडलो? पण रडणं म्हणजे कमकुवतपणा नाही. ते तर आपल्या आत्म्याचं विलयन असतं – आपल्या अस्तित्वातील त्या व्यक्तीचा अंश आपल्यातून गळून पडत असतो. या दुःखाच्या प्रवासात एक क्षण असा येतो, जेव्हा आपण विचारतो – हे सगळं का घडलं? का असा अचानक अंत झाला? पण उत्तर कधीही बाहेर मिळत नाही. ते उत्तर आपल्याला आपल्या अंतर्मनात शोधावं लागतं. आणि ते उत्तर असतं – काही माणसं आपल्या आयुष्यात येतात फक्त आपल्याला काही शिकवण्यासाठी, आणि मग त्या निघून जातात. पण त्यांचं जाणंही एक शिकवणच असते. त्या व्यक्तीच्या नसण्यातून आपण त्यांचं खरं अस्तित्व शोधतो. त्यांच्या वारशामध्ये आपण त्यांच्या विचारांची झलक पाहतो – आणि त्यांच्या आठवणींच्या सावलीत आपण नवा ‘स्व’ शोधायला लागतो. कारण मृत्यू केवळ अंत नव्हे – तो आरंभही असतो. आपल्या आत्म्याच्या ज्या भागाकडे आपण कधी लक्ष दिलं नव्हतं, तिथे ही दुःखाची भावना आपल्याला घेऊन जाते. आणि तिथे पोहोचल्यावर आपल्याला उमगतं – मरणं हे संपणं नाही, तर एक नवा जन्म आहे – आपल्याच एका नवीन जाणिवेचा. या सगळ्या चिंतनात मृत व्यक्तीच्या फोटोंपलीकडे जाणं महत्त्वाचं असतं. कारण वारसा म्हणजे केवळ आठवणी नव्हेत – तो आहे त्यांच्या आयुष्यातल्या मूल्यांचा, कृतीचा आणि आपल्या मनावर उमटलेल्या संस्कारांचा ठसा. त्यांनी दाखवलेला प्रेमाचा मार्ग, सत्याचं भान, आणि जगण्यातली सच्चाई – हाच त्यांच्या अस्तित्वाचा खरा ठेवा असतो. आणि आपण तो पुढे चालवणं – हाच त्यांच्या जाण्याचा अर्थ असतो. शेवटी, मृत्यू ही पोकळी नाही – तो एक प्रकाशद्वार आहे. त्यातून आपण दुःखाच्या अंधारातून स्वतःकडे आणि जीवनाच्या गूढतेकडे पाहायला शिकतो. हे दुःख आपल्याला खचवत नाही, तर हलवतं. ते आपल्याला नवं काहीतरी घडवायला प्रेरित करतं – एक नव्या जाणीवेचं जीवन जगायला शिकवतं. "दुःख हे जीवनाचं शोकगीत नसतं – ते आत्म्याचं मौन संगीत असतं, ज्याला ऐकायला शिकलं, तर मृत्यूही एक नवीन जीवन वाटू लागतं."