स्वातंत्र्यदिनाचा भव्य सोहळा हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये उत्साहात साजरा
- Neel Deshpande
- Aug 15
- 1 min read
१५ ऑगस्ट २०२५, पुणे
हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७९ वा स्वातंत्र्यदिन देशभक्तीच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. १५ ऑगस्ट हा भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील सुवर्णदिन असून, १९४७ साली भारताने ब्रिटिशांच्या २०० वर्षांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य संपादन केले. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधत शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

सकाळी ७.३० वाजता शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक व अध्यक्ष श्री. कृष्णा भिलारे, सचिव सौ. संगीता भिलारे, संचालक श्री. कुणाल भिलारे आणि सौ. यशश्विनी भिलारे यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. यावेळी मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना स्वातंत्र्यदिनाचे राष्ट्रभावनेतील महत्त्व अधोरेखित केले.

यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. स्काऊट आणि गाईड पथकाच्या संचलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांनी भाषण, देशभक्तीपर गीत, नृत्य, आणि नाट्यछटा सादर करून स्वातंत्र्याचा संदेश प्रभावीपणे मांडला.

कार्यक्रमादरम्यान, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील विज्ञान-गणित ऑलिम्पियाडमध्ये विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिके प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्या डॉ. रेणू पाटील यांनी सर्व मान्यवरांचे उपस्थितीसाठी आभार मानत देशप्रेम आणि नागरिकत्वाच्या मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन केले.

हा स्वातंत्र्यदिन सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला, तसेच भारतीय इतिहास, संस्कृती आणि कर्तव्यभावनेबद्दलची जाण अधिक दृढ झाली.
Comments