तिसरा राज्यस्तरीय श्रावणधारा काव्यमहोत्सव ओतूर येथे उत्साहात संपन्न
- Neel Deshpande
- 1 day ago
- 2 min read
'तिसरा राज्यस्तरीय श्रावणधारा काव्यमहोत्सव २०२५' व 'पुस्तक प्रकाशन सोहळा' अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर येथे रविवार दि.१० ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उदघाटन मा. जि. प. सदस्य मोहितशेठ ढमाले व मा. जि. प. सदस्य अंकुशशेठ आमले यांनी शिवप्रतिमेचे पूजन करून व वृक्ष पूजन करून केले. प्रमुख पाहुणे म्हणून अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे, मराठी विभाग प्रमुख डॉ. वसंत गावडे आणि ओतूरच्या सरपंच डॉ. छाया तांबे उपस्थित होते. महाराष्ट्र गीताने आणि मराठी भाषा संवर्धन प्रतिज्ञा वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

अण्णासाहेब वाघिरे विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविक राजेश साबळे यांनी तर पाहुण्यांच्या स्वागतासाठी मनोगत प्रा. सुरेश डुंबरे यांनी व्यक्त केले . याप्रसंगी करंजाळे, ता. जुन्नर येथील जिल्हा परिषद शाळेच्या तीन विद्यार्थ्यांनी त्यांच्या कवितांचे वाचन केले.
काव्य सादरीकरणामध्ये राज्यभरातील १०० कवी आणि कवयित्रींनी सहभाग घेतला होता. उत्तम सदाकाळ, यशवंत घोडे व शोभा गवांदे या ज्येष्ठ साहित्यिकांनी काव्य वाचन स्पर्धेचे परीक्षण केले. त्यांमधून सर्वोत्कृष्ठ ठरलेल्या व सहभागी साहित्यिकांचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. निवृत्ती महाराज कानवडे, संगमनेर (प्रथम), गौतम वाघमारे, संगमनेर (द्वितीय), शब्द स्वरा मंगरूळकर, मंगरूळ पारगाव, पुणे (तृतीय), नवनाथ सरोदे आंबी दुमाला, संगमनेर (चतुर्थ) आणि देवेंद्र गावंडे, जि. अकोला (पाचवा) हे काव्य स्पर्धेचे विजेते ठरले.
या काव्य महोत्सवात राजेश साबळे यांच्या 'अस्तित्व,' प्रा. सुरेश डुंबरे यांच्या 'वेदनेच्या गर्भकळीतून,' डॉ. प्रवीण डुंबरे यांच्या 'उनाड पाऊस' व महोत्सव समितीच्या 'श्रावणधारा भाग - २' या काव्य संग्रहांचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राजेश साबळे ओतूरकर, डॉ. खं. र. माळवे, प्रा. सुरेश गे. डुंबरे, डॉ. प्रवीण डुंबरे हे जेष्ठ साहित्यिक उपस्थित होते. संजय गवांदे, प्रा. नागेश हूलवळे यांनी या संपूर्ण काव्य महोत्सवाचे निवेदन केले. विश्वविक्रमी रांगोळीकार सौ. हर्षा काळे यांच्या मनोवेधक रांगोळीने महोत्सवासाठी आलेल्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रणजित पवार यांनी आलेल्या सर्व साहित्यिकांचे आभार मानले आणि पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments