"विठ्ठल नामाची शाळा भरली!" – हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्सव साजरा
- Team Stay Featured
- Jul 7
- 1 min read
मुळशी तालुक्यातील कासार आंबोली येथील हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये दिनांक ४ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशीचा पारंपरिक आणि भक्तिभावपूर्ण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी आकर्षक फुलांनी सजवलेली पालखी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सजवण्यात आली. या पालखीचे पूजन व्यवस्थापन समितीच्या कु. समिधा भिलारे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. रेणू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीला फुलपुष्प अर्पण करत भाविकतेने पूजा संपन्न झाली.

विद्यार्थ्यांची "पायी दिंडी" हा कार्यक्रम उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरला. "विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल" च्या घोषात पद्मावती मंदिर ते विठ्ठल मंदिर असा मार्ग पार करत दिंडी पुन्हा शाळेत परतली. पारंपरिक पोशाखातील विद्यार्थ्यांनी परिसर भक्तिरसात न्हावून निघाला.
कार्यक्रमाची सुरुवात दमदार लेझीम आणि पारंपरिक नृत्याने झाली. सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी रिंगण सादर करत उपस्थितांची मने जिंकली. यानंतर पारंपरिक वेशभूषा, कीर्तन, अभंग गायन, भारूड, श्लोक पठण अशा विविध स्पर्धांनी साजरेपणात भर घातली. लहान मुलांसाठी तुळस सजावट व पालखी सजावटीच्या स्पर्धा घेण्यात आल्या.
या सर्व उपक्रमांत विद्यार्थ्यांचा सहभाग वाखाणण्याजोगा होता. शाळेच्या संचालक, व्यवस्थापक व मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा झालेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मनात सांस्कृतिक मुळे रुजवणारा ठरला.
– प्रतिनिधी,हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल, कासार आंबोली, मुळशी
Comments