top of page

Search Results

80 results found with an empty search

  • जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये जनजागृती कार्यक्रम

    कासार आंबोली येथील हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘जागतिक लोकसंख्या दिना’निमित्त विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अतिरिक्त लोकसंख्येच्या परिणामांबाबत कविता, गाणी, पीपीटी प्रेझेंटेशन आणि भाषणे सादर करून समाजात जागरूकता निर्माण केली. कार्यक्रमात लोकसंख्यावाढीची कारणे, परिणाम आणि उपाय यांवर सखोल चर्चा झाली. विद्यार्थ्यांनी पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे विषयाची माहिती प्रभावीपणे मांडली. शाळेच्या प्राचार्या डॉ. रेणू पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबंधित प्रश्न विचारून त्यांची जागरूकता तपासली आणि या जनजागृती कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांनी प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन लोकसंख्या वाढीच्या समस्येविषयी आपली जाणीव दर्शवली. यावेळी ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ या शासकीय उपक्रमाची माहिती देण्यात आली. लोकसंख्येचा समतोल राखण्याचे महत्त्व आणि त्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला. कार्यक्रमाला शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. कृष्णा भिलारे, सचिव सौ. संगीता भिलारे, व्यवस्थापकीय संचालक श्री. कुणाल भिलारे, सौ. यशस्विनी भिलारे, प्राचार्या तसेच शिक्षक उपस्थित होते. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यात यशस्वी ठरला आणि लोकसंख्या नियंत्रणाच्या महत्त्वाविषयी महत्त्वपूर्ण संदेश दिला.

  • "विठ्ठल नामाची शाळा भरली!" – हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्सव साजरा

    मुळशी तालुक्यातील कासार आंबोली येथील हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल मध्ये दिनांक ४ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशीचा पारंपरिक आणि भक्तिभावपूर्ण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी आकर्षक फुलांनी सजवलेली पालखी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सजवण्यात आली. या पालखीचे पूजन व्यवस्थापन समितीच्या कु. समिधा भिलारे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. रेणू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीला फुलपुष्प अर्पण करत भाविकतेने पूजा संपन्न झाली. विद्यार्थ्यांची "पायी दिंडी" हा कार्यक्रम उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरला. "विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल" च्या घोषात पद्मावती मंदिर ते विठ्ठल मंदिर असा मार्ग पार करत दिंडी पुन्हा शाळेत परतली. पारंपरिक पोशाखातील विद्यार्थ्यांनी परिसर भक्तिरसात न्हावून निघाला. कार्यक्रमाची सुरुवात दमदार लेझीम आणि पारंपरिक नृत्याने झाली. सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी रिंगण सादर करत उपस्थितांची मने जिंकली. यानंतर पारंपरिक वेशभूषा, कीर्तन, अभंग गायन, भारूड, श्लोक पठण अशा विविध स्पर्धांनी साजरेपणात भर घातली. लहान मुलांसाठी तुळस सजावट व पालखी सजावटीच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व उपक्रमांत विद्यार्थ्यांचा सहभाग वाखाणण्याजोगा होता. शाळेच्या संचालक, व्यवस्थापक व मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा झालेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मनात सांस्कृतिक मुळे रुजवणारा ठरला. – प्रतिनिधी,हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल, कासार आंबोली, मुळशी

  • “दाजी काका : प्रेम, प्रेरणा आणि आठवणींचा अमूल्य ठेवा”- डॉ प्रतिक मुणगेकर

    दाजी काका... तुमचं जाणं अंतःकरणाचा ठाव घेऊन गेलं.. माझी आणि दाजी काकांची पहिली भेट 2011 साली झाली, जेव्हा त्यांनी आमच्या शाळेला ‘विवेकानंद पुरस्कार’ देण्यासाठी भेट दिली होती. त्याच वर्षी सलग तीन दिवस त्यांनी घेतलेली ‘महाभारत’वरील व्याख्यानमालिका ऐकण्याचा योग आला. त्या शब्दांनी श्रोत्यांच्या मनामध्ये जणू मंत्रच फुंकला होता—अप्रतिम, अवर्णनीय अनुभव! मग जवळजवळ आठ वर्षांनी, नंदिनी ताईंमुळे पुन्हा एकदा दाजी काकांच्या सान्निध्यात येण्याचा योग आला. त्या भेटीनंतर मात्र अनेकदा त्यांच्या सहवासाचा, ज्ञानस्पर्शाचा आणि मायेच्या उबदार सावलीचा अनुभव घ्यायला मिळाला. हे माझं भाग्यच म्हणावं लागेल. दाजी काकांनी माझ्या एका पुस्तकासाठी प्रस्तावनाही लिहिली. माझ्या प्रत्येक पुस्तकाला त्यांनी आनंदाने आणि पूर्ण उत्साहाने स्वीकारलं, कौतुक केलं, आणि भरभरून आशीर्वाद दिला. त्यांच्या घरी अनेकदा तासनतास बसून त्यांच्या विविध विषयांवरील चिंतन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विचारांची खोली ऐकण्याचा योग आला – किती भाग्यवान आहे मी! ठाण्यात एकदा त्यांच्या व्याख्यानाला गेलो होतो. मी त्यांच्या साठी एक भेटवस्तू आणली होती. व्यासपीठावर जाऊन त्यांना ती दिली आणि नमस्कार केला. तेव्हा त्यांनी सर्वांसमोर माझं कौतुक करत, “हा माझा शिष्य आहे,” असं जाहीर केलं. त्या क्षणात जो आनंद मिळाला, ती ऊर्जा, तो गौरव – तो क्षण कायमचा हृदयात कोरला गेला. केवळ चार दिवसांपूर्वी मी फिलिपिन्समध्ये कार्यसंदर्भात होतो. तेव्हा माझा जिवलग मित्र पियूष याचा व्हिडीओ कॉल आला. त्यातून कळलं की दाजी काकांची तब्येत थोडी नरम आहे. पण अशा अवस्थेतही त्यांनी माझी आठवण काढली होती, विचारलं होतं – “प्रतिक कधी येणार?” “तो आता कायमचा फिलिपिन्समध्येच राहणार का?” हे प्रेम, ही आपुलकी, ही काळजी… शब्द अपुरे पडतात हे व्यक्त करायला. त्यांनी मला भरभरून दिलं – प्रेम, मार्गदर्शन, आशीर्वाद… आणि मी त्यांच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकत नाही. किती आठवणी, किती प्रसंग… सगळं लिहावं तर शब्दही थकतील. दाजी काका, माझा साष्टांग नमस्कार तुम्हाला. तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, कायम राहतील याची खात्री आहे. आणि हो, तुम्ही सांगितलं होतं – “मराठीत पुस्तक लिही…” ती इच्छा मी पूर्ण करत आहे. लवकरच ते पुस्तक प्रकाशित होणार आहे… आणि ते संपूर्णपणे तुम्हाला समर्पित करतो. तुमचं प्रेम, शिकवण आणि आशीर्वाद – आयुष्यभराचं प्रेरणास्थान. इति लेखनसीमा (एक स्नेहबंध, एक ऋण, एक अमूल्य ठेवा...) -प्रतिक दाजी पणशीकर ह्यांच्याविषयी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वैचारिक विश्वात अढळ स्थान असलेले ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि वक्ते दाजी पणशीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांनी विविध वृत्तपत्रांमधून लिहिलेल्या लेखमालांनी महाराष्ट्राला समृद्ध वैचारिक ठेवा दिला. 'महाभारत एक सुडाचा प्रवास', 'कर्ण खरा कोण होता?', 'कथामृतम', 'कणिकनिती', 'स्तोत्र गंगा' (शंकराचार्यांच्या स्तोत्रांवर आधारित, दोन भाग), 'अपरिचित रामायण' (पाच भाग), 'गानसरस्वती किशोरी आमोणकर - आदिशक्तीचा धन्योद्गार' यांसारख्या त्यांच्या ग्रंथांच्या 30 हून अधिक आवृत्त्या प्रकाशित झाल्या. विषयाचा सखोल व्यासंग, चिंतनशीलता, स्पष्ट भूमिका आणि परखड विवेचन ही त्यांच्या लेखन आणि वक्तृत्वाची ओळख होती. त्यांचे थोरले बंधू प्रभाकर पणशीकर यांच्या 'नाट्यसंपदा' नाट्यसंस्थेचे व्यवस्थापक म्हणून दाजी पणशीकर यांचा मराठी साहित्य, संगीत, नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांशी घनिष्ठ संबंध आला. गेल्या 50 वर्षांतील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचे साक्षीदार असलेले हे महान व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या निधनाने मराठी सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

  • डॉ. जयंत नारळीकर : बालमनाला अंतराळाची स्वप्नं दाखवणारा तारा -साहिल मुल्ला

    रविवारची सकाळ असायची... दूरदर्शनवर एक गंभीर चेहरा, पण त्याच्या डोळ्यात चमक असायची – डॉ. जयंत नारळीकर. काय बोलायचे ते कळायचं नाही, पण त्यांचं बोलणं ऐकताना वाटायचं, आपल्याला काहीतरी फार मोठं, अद्भुत समजून घ्यायचं आहे. त्या वयात विज्ञान म्हणजे पुस्तकातलं काहीतरी कंटाळवाणं, पण नारळीकर सरांनी विज्ञानाला एका विलक्षण थरारात बदलून टाकलं. अंतराळ, तारे, कृष्णविवर, विश्वाचा विस्तार – या कल्पनाच आपल्यासाठी त्यांच्यामुळे अस्तित्वात आल्या. १९३८ साली कोल्हापूरमध्ये जन्मलेले जयंत विष्णू नारळीकर हे लहानपणापासूनच गणित आणि विज्ञानाची ओढ बाळगणारे. त्यांच्या वडिलांचाही अभ्यासू वारसा त्यांच्या रक्तात होता. पुढे त्यांनी केंब्रिज विद्यापीठात शिक्षण घेतलं आणि तिथेच त्यांनी महान खगोलशास्त्रज्ञ सर फ्रेड हॉयल यांच्यासोबत काम करत "Steady State Theory" निर्माण केली. आज साऱ्या जगात बिग बँग सिद्धांताला पर्याय म्हणून या विचाराला स्थान आहे. म्हणजेच ते फक्त वैज्ञानिक नव्हते, तर एक सिद्धांत निर्माते होते. विदेशात नाव कमवून भारतात परतल्यावर त्यांनी विज्ञानातील संशोधनाला नवी दिशा दिली. पुण्यात IUCAA – इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स – या संस्थेची स्थापना करून हजारो विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना दिशा दिली. ही संस्था केवळ संशोधन केंद्र नव्हे, तर विचारमंथन आणि विज्ञानप्रेमींसाठी उभारलेलं मंदिर आहे असं म्हणावं लागेल. त्यांचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे विज्ञानसाहित्य लेखन. त्यांनी मराठीत आणि इंग्रजीत अनेक पुस्तकं लिहिली – जी केवळ विद्वानांसाठी नाही, तर सर्वसामान्य वाचकासाठी होती. विज्ञान या विषयाची जडजंबाल भाषा त्यांनी इतकी सहज सोपी करून दिली, की लहान वाचक सुद्धा ‘क्वासार’, ‘ब्लॅक होल’ किंवा ‘टाईम डिलेशन’ सारख्या संकल्पना वाचून थक्क व्हायचे. त्यांची भाषणं, त्यांचे लेख, आणि दूरदर्शनवरील कार्यक्रम म्हणजे जणू एक विज्ञानयात्रा होती – समजून घेण्याची, विचार करण्याची, आणि प्रश्न विचारण्याची प्रेरणा देणारी. लहानपणापासून ज्यांनी ‘"तारे ’' मोजण्याच्या "पलीकडे जाऊन "विश्व कसं तयार झालं?", "आपण कोण?" हे प्रश्न विचारायला शिकवलं, अशा व्यक्तीचं आयुष्य आपल्याला किती तरी पटीने समृद्ध करून जातं. आम्हाला जेव्हा खगोलशास्त्राविषयी जिज्ञासा वाटू लागली, तेव्हा तिचं मूळ कुठे आहे हे लक्षात आलं – दूरदर्शनवर पाहिलेला एक झगमगता चेहरा आणि पुस्तकांच्या ओळींमधून आलेला तो आवाज – डॉ. जयंत नारळीकर. २० मे २०२५ रोजी ते आपल्यातून निघून गेले. पण त्यांनी रुजवलेली ज्ञानाची, विचारांची बीजं आज लाखो तरुणांमध्ये उगवलेली आहेत. आज विज्ञानात करिअर करणारे, अंतराळात स्वप्नं पाहणारे, संशोधनात रमणारे हे सारे विद्यार्थी त्यांच्या त्या एका प्रेरणादायी अस्तित्वाचे परिणाम आहेत. काही व्यक्तिमत्त्वं काळाच्या पलीकडची असतात. त्यांचं शरीर जातं, पण त्यांचे विचार, त्यांची ऊर्जा, आणि त्यांनी दिलेलं दृष्टीकोन जगात तग धरून राहतो. डॉ. नारळीकर हे असंच एक तेजस्वी ताऱ्यासारखं व्यक्तिमत्त्व होतं – त्यांनी विज्ञानाच्या आकाशात अंधार नसावा, म्हणून आपला प्रकाश आयुष्यभर देत राहिला. आज त्यांच्या आठवणीत डोळे पाणावतात, पण मन मात्र गर्वानं भरून जातं – की आपण अशा काळात जन्मलो, ज्या काळात डॉ. जयंत नारळीकर होते. विज्ञानातही संवेदनशीलता असते, हे त्यांनी शिकवलं. हे आयुष्यभर पुरणारं शिक्षण आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! प्रा. साहिल रज्जाक मुल्ला +91 9834627773

  • विश्वकल्याण इंग्रजी माध्यमिक शाळेचा CBSE दहावी बोर्डात १००% निकालाचा दैदिप्यमान विजय!

    पिंपरी-चिंचवडच्या चिखली येथील विश्वकल्याण इंग्रजी माध्यमिक शाळेने पुन्हा एकदा आपली शैक्षणिक उत्कृष्टतेची परंपरा कायम ठेवत CBSE दहावी बोर्ड परीक्षेत १००% यश मिळवले आहे! ही अभूतपूर्व कामगिरी शाळेच्या सर्वांगीण शिक्षण पद्धती, अत्याधुनिक सुविधा आणि शिक्षक-विद्यार्थी-पालक यांच्या एकजुटीच्या सामर्थ्याचे उत्तम उदाहरण आहे.शाळेची खास वैशिष्ट्येपिंपरी-चिंचवड परिसरात ‘अ‍ॅस्ट्रोनॉमी लॅब’ असलेली एकमेव शाळा म्हणून विश्वकल्याणने विशेष ओळख निर्माण केली आहे. अत्याधुनिक प्रयोगशाळा, विस्तीर्ण कॅम्पस आणि विविध सहली-कार्यक्रम यांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो. . शाळेच्या नेतृत्वाचा मोलाचा वाटाशाळेचे अध्यक्ष श्री. जितेंद्र मेहता, संचालिका सौ. नीलम मेहता आणि मुख्याध्यापिका डॉ. दीपाली शिरगावे यांच्या दूरदृष्टीने शाळेने शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. डॉ. शिरगावे यांनी CBSE मास्टर ट्रेनर म्हणून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कार्यशाळा आणि मानसिक-शैक्षणिक तयारीसाठी सत्रांचे आयोजन केले जाते.सर्वांगीण विकासाला चालनाविज्ञान, साहित्य, रोबोटिक्स आणि अंतराळशास्त्र यांसारख्या क्लब्समुळे विद्यार्थ्यांच्या आवडी आणि कौशल्यांना प्रोत्साहन मिळते. CBSE दहावी निकाल प्रेरणा पाटील – ९३.००% प्रियांशु जितेंद्रकुमार – ९१.२०% इश्वरी मेश्राम – ९०.६०% रणिता पी. हिरुगडे – ९०.४०% साक्षी राजपूरोहित – ८९.८०% वैष्णवी संजय सिंग – ८७.४०% विश्वाम पवन तिवारी – ८७.०४% या विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणि शाळेच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाला मनापासून सलाम! शाळेच्या नेतृत्वाचा मोलाचा वाटाशाळेचे अध्यक्ष श्री. जितेंद्र मेहता, संचालिका सौ. नीलम मेहता आणि मुख्याध्यापिका डॉ. दीपाली शिरगावे यांच्या दूरदृष्टीने शाळेने शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. डॉ. शिरगावे यांनी CBSE मास्टर ट्रेनर म्हणून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कार्यशाळा आणि मानसिक-शैक्षणिक तयारीसाठी सत्रांचे आयोजन केले जाते.सर्वांगीण विकासाला चालनाविज्ञान, साहित्य, रोबोटिक्स आणि अंतराळशास्त्र यांसारख्या क्लब्समुळे विद्यार्थ्यांच्या आवडी आणि कौशल्यांना प्रोत्साहन मिळते. अ‍ॅस्ट्रोनॉमी लॅबसारख्या अत्याधुनिक सुविधा विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या भविष्यासाठी सज्ज करतात. संपर्कासाठी माहिती शाळेच्या प्रवेशासाठी संपर्क साधा:फोन: ७२४९६७२५९३ वेबसाइट: www.vishwakalyanschool.in CBSE संलग्नता क्रमांक: ११३०७९६ विश्वकल्याण इंग्रजी माध्यमिक शाळा विद्यार्थ्यांना ज्ञान, मूल्ये आणि आत्मविश्वासाने सक्षम बनवण्यासाठी कटिबद्ध आहे. हा यशस्वी प्रवास पाहून प्रत्येकाला अभिमान वाटतो!

  • हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलचे सीबीएसई बोर्ड परीक्षेत सुयश

    कासार आंबोली तालुका मुळशी येथील ज्ञानदीप शिक्षण संस्था संचलित हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सीबीएससी बोर्ड परीक्षेत उज्वल यश मिळवले आहे शाळेचा निकाल 98 टक्के लागलेला आहे सीबीएससी बोर्डाचा दहावीचा निकाल नुकता जाहीर झाला त्यामध्ये शाळेतील राजन कुंभार 97% , सुजल हेरकर 94.4% मयुरेश पाटील 85.4% ,नील राऊत 85.2%, अनुष्का भोसले 83.4% मानसी शिंदे 77.2% ,सानवी सावंत 77%, संचित नखाते 75.8%, वेदांत राऊत 75.6%, समीक्षा वाकोडे 75.2%, असे गुणानुक्रमे 10 क्रमांक पटकावले . विद्यार्थी केंद्रीय शिक्षण पद्धती, अनुभवी व तज्ञ शिक्षक, सुसज्ज प्रयोगशाळा,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम व आधुनिक शिक्षण पद्धती यामुळे शाळेने यापूर्वी दोन वेळा 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' उपक्रमा अंतर्गत तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक पटकावले आहेत. तसेच 'राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार' मिळाला आहे. यंदा सीबीएसईच्या दहावी बोर्डामध्येही विद्यार्थ्यांनी विविध विषयात 90 पेक्षा जास्त गुण मिळवलेले आहेत. राजन कुंभार याने हिंदी मध्ये 100 पैकी 100 घेऊन एक उच्चस्थान मिळवले आहे.त्याला गणित विषयात 99 , इंग्लिश मध्ये 98, विज्ञान मध्ये 94, समाजशास्त्र मध्ये 94 गुण मिळालेले आहेत. विद्यार्थी, शिक्षक पालक व व्यवस्थापन या सर्वांच्या एकजुटीने हे संपादन करणे शक्य झाले आहे,असे प्राचार्य डॉ. रेणू पाटील यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या सर्वोत्तम यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा भिलारे, सचिव संगीता भिलारे , संचालक कुणाल भिलारे, कार्यकारी प्रशासकीय व्यवस्थापिका यशस्विनी भिलारे, प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांचे , शिक्षकांचे व पालकांचे कौतुक केले आणि आणि सर्व विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

  • दुःख – एक विदारक सत्य : मृत्यूवर एक नव्या दृष्टीकोनातून चिंतन -डॉ. प्रतिक मुणगेकर

    "दुःख एक विदारक सत्य आहे." या वाक्याचा खरा अर्थ तेव्हाच उमजतो, जेव्हा एखादी आपली जवळची व्यक्ती अचानकपणे आपल्या आयुष्यातून कायमची निघून जाते. त्या एका क्षणात काळ स्तब्ध होतो, मन शून्य होतं, आणि एक शब्दही उच्चारायची ताकद राहत नाही. मृत्यू म्हणजे केवळ एका व्यक्तीचा अंत नव्हे, तर त्याच्याशी असलेल्या असंख्य आठवणी, अपूर्ण संभाषणं, आणि न संपलेल्या नात्यांचा शांत विस्फोट असतो. अनेकदा आपण मृत्यूला ‘शेवट’ म्हणतो, पण खरे पाहता मृत्यू म्हणजे एक संक्रमण आहे – एका अवस्थेतील दुसऱ्या अवस्थेकडे नेणारा गूढ प्रवास. मृत्यू ही एक अशा प्रकारची अनुपस्थिती आहे, जिथे त्या व्यक्तीचं अस्तित्व प्रत्येक क्षणात अधिक ठळकपणे जाणवतं. तो आपल्यात नसतो, पण त्याचं असणं सतत आपल्या विचारांमध्ये, स्वप्नांमध्ये आणि आठवणींच्या धूसर छायेत वावरत राहतं. मृत्यूचा अनुभव म्हणजे फक्त रडणं, हरवणं किंवा विरह नव्हे – तो आत्म्याला हलवणारा आणि विचारांचं मूळच बदलणारा अनुभव असतो. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, त्यांचं अस्तित्व आपल्यासाठी इतकं गृहित धरलेलं असतं की, त्यांच्या जाण्याने आपण आपलं अर्धं आयुष्यच हरवतो, असं वाटतं. पण खरंतर, त्यांची अनुपस्थितीच आपल्याला त्यांच्या खरी उपस्थितीची जाणीव करून देते. दुःख ही केवळ भावना नसते – ती एक प्रक्रिया असते. ती आपल्याला अंतर्मनातल्या खऱ्या स्वरूपाशी भेट घडवते. दुःख म्हणजे शब्दात न मांडता येणारी व्यथा – जी डोळ्यांतून अश्रूंमधून नाही, तर आत्म्यातून प्रकट होते. त्या प्रक्रियेत आपण हळूहळू समजून घेतो की, माणूस फक्त शरीराने नसतो, तर त्याच्या विचारांनी, कृतींनी आणि स्मृतींनी आपल्या आयुष्यात सतत जिवंत असतो. मृत्यू नातं तोडत नाही, ते फक्त त्याचं स्वरूप बदलतं. तो संवाद बंद करत नाही, तो शब्दांशिवाय नवा संवाद सुरू करतो. आपण त्या व्यक्तीशी मनात बोलतो, त्यांच्या आठवणींना स्पर्श करतो, आणि अनेकदा त्यांच्या शिकवणीतून नव्याने जगायला शिकतो. कधी वाटतं – आपण का रडलो? पण रडणं म्हणजे कमकुवतपणा नाही. ते तर आपल्या आत्म्याचं विलयन असतं – आपल्या अस्तित्वातील त्या व्यक्तीचा अंश आपल्यातून गळून पडत असतो. या दुःखाच्या प्रवासात एक क्षण असा येतो, जेव्हा आपण विचारतो – हे सगळं का घडलं? का असा अचानक अंत झाला? पण उत्तर कधीही बाहेर मिळत नाही. ते उत्तर आपल्याला आपल्या अंतर्मनात शोधावं लागतं. आणि ते उत्तर असतं – काही माणसं आपल्या आयुष्यात येतात फक्त आपल्याला काही शिकवण्यासाठी, आणि मग त्या निघून जातात. पण त्यांचं जाणंही एक शिकवणच असते. त्या व्यक्तीच्या नसण्यातून आपण त्यांचं खरं अस्तित्व शोधतो. त्यांच्या वारशामध्ये आपण त्यांच्या विचारांची झलक पाहतो – आणि त्यांच्या आठवणींच्या सावलीत आपण नवा ‘स्व’ शोधायला लागतो. कारण मृत्यू केवळ अंत नव्हे – तो आरंभही असतो. आपल्या आत्म्याच्या ज्या भागाकडे आपण कधी लक्ष दिलं नव्हतं, तिथे ही दुःखाची भावना आपल्याला घेऊन जाते. आणि तिथे पोहोचल्यावर आपल्याला उमगतं – मरणं हे संपणं नाही, तर एक नवा जन्म आहे – आपल्याच एका नवीन जाणिवेचा. या सगळ्या चिंतनात मृत व्यक्तीच्या फोटोंपलीकडे जाणं महत्त्वाचं असतं. कारण वारसा म्हणजे केवळ आठवणी नव्हेत – तो आहे त्यांच्या आयुष्यातल्या मूल्यांचा, कृतीचा आणि आपल्या मनावर उमटलेल्या संस्कारांचा ठसा. त्यांनी दाखवलेला प्रेमाचा मार्ग, सत्याचं भान, आणि जगण्यातली सच्चाई – हाच त्यांच्या अस्तित्वाचा खरा ठेवा असतो. आणि आपण तो पुढे चालवणं – हाच त्यांच्या जाण्याचा अर्थ असतो. शेवटी, मृत्यू ही पोकळी नाही – तो एक प्रकाशद्वार आहे. त्यातून आपण दुःखाच्या अंधारातून स्वतःकडे आणि जीवनाच्या गूढतेकडे पाहायला शिकतो. हे दुःख आपल्याला खचवत नाही, तर हलवतं. ते आपल्याला नवं काहीतरी घडवायला प्रेरित करतं – एक नव्या जाणीवेचं जीवन जगायला शिकवतं. "दुःख हे जीवनाचं शोकगीत नसतं – ते आत्म्याचं मौन संगीत असतं, ज्याला ऐकायला शिकलं, तर मृत्यूही एक नवीन जीवन वाटू लागतं."

  • त्रिशुंड गणपतीपासून लाल महालापर्यंत - वर्ल्ड हेरिटेज डे निमित्त रेडिओ मिर्ची पुणेची खास हेरिटेज वॉक

    पुणे, २८ एप्रिल २०२५: वर्ल्ड हेरिटेज डे (१८ एप्रिल) आणि रेडिओ मिर्ची पुणेच्या २३ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने, पुणेकरांसाठी एक खास हेरिटेज वॉक आयोजित करण्यात आला — ज्याला पुणेकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शनिवार सकाळी, हा वॉक त्रिशुंड गणपती, जुना किल्ला, गुंडाचा गणपती, कसबा गणपती मार्गे लाल महाल येथे संपन्न झाला. प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ प्रसाद तारे आणि त्यांच्या टीमने हा वॉक मार्गदर्शित केला आणि पुण्याच्या समृद्ध इतिहासातील अनेक अदमास न लागलेली माहिती उलगडून दाखवली. या हेरिटेज वॉकमध्ये सुमारे ३५ पुणेकरांनी सहभाग घेतला आणि पुण्याचा ऐतिहासिक वारसा नव्याने नुभवला. भाग घेणाऱ्या काही पुणेकरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या: • अमित चव्हाण म्हणाले, “मी जन्माने पुणेकर आहे पण कसबा पेठेत किल्ला आहे हे मला आजवर माहीतच नव्हतं. एकदम डोळे उघडणारा अनुभव!” • राहुल बुलबुले, एक अनुभवी प्रवासी, म्हणाले, “इथे वाढलो तरी आज अनेक नवीन गोष्टी कळल्या.” • श्रावणी, एक विद्यार्थीनी, म्हणाली, “पाठ्यपुस्तकात जे वाचलं होतं ते आज खरंखुरं अनुभवता आलं!” ही संपूर्ण संकल्पना आरजे उत्सवी आणि आरजे निधी यांनी पुढाकाराने राबवली, ज्यांना मिर्ची टीमचे दर्शन, केतन आणि रक्षित यांनी साथ दिली. कार्यक्रमाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना, स्मिता रणदिवे, क्लस्टर हेड, रेडिओ मिर्ची, म्हणाल्या, “पुण्याचा ऐतिहासिक वारसा खूप समृद्ध आहे आणि गेल्या २३ वर्षांपासून आम्ही या सुंदर शहराचा भाग आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. आपल्या श्रोत्यांसाठी ही एक छोटी भेट होती — आणि मला आनंद आहे की या वॉकमुळे त्यांना फक्त आठवणी नव्हे तर आपल्या शहराबद्दल नवीन माहिती घेऊन जाता आली.” हा सुंदर सकाळचा प्रवास नाश्त्याने, हसऱ्या चेहऱ्यांनी आणि गप्पागोष्टींनी संपला — आणि पुन्हा एकदा जाणवलं, “वारसा हा फक्त वास्तूंपुरता मर्यादित नसतो, तो माणसांच्या आठवणीत जिवंत राहतो.”

  • करंजाळे शाळेतील मुलांनी लिहिलेल्या "निसर्गाची शाळा" या कवितासंग्रहांचा प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न

    करंजाळे: आंतरराष्ट्रीय कला दिन व करंजाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून "निसर्गाची शाळा" या बालकविता संग्रहाचा प्रकाशन मंगळवार दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी मा.श्री.विठ्ठलराव भोईर ( गटविकास अधिकारी,पं.स.जुन्नर) व कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश साबळे ओतुरकर (अध्यक्ष, श्रावणधारा काव्य महोत्सव समिती) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी वि. रा. धोंडगे (शिक्षण विस्तार अधिकारी, पं.स.जुन्नर ), पां. वि. भौरले (शिक्षण विस्तार अधिकारी, पं. स. आंबेगाव ), बा. म. भालेकर ( केंद्रप्रमुख, सितेवाडी), सा. भा. मांडवे ( केंद्रप्रमुख, मढ), श्रावणधारा समितीचे कार्याध्यक्ष प्रा. सुरेश डुंबरे, उपाध्यक्ष डॉ. खं. र. माळवे, सचिव डॉ. प्रविण डुंबरे, सहसचिव संजय गवांदे, खजिनदार व लेण्याद्री प्रकाशनाचे प्रकाशक रणजीत पवार, सहखजिनदार तथा वर्ल्ड व्हिजन टाईम्स मुंबई साहित्यिक दैनिकचे संपादक प्रा. नागेश हुलावळे व करंजाळे ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील मुंढे, उपाध्यक्षा सैंद्रा शेळके, सदस्य नंदकिशोर जगताप, दिनेश जगताप युवराज ढेंगळे, दशरथ कोरडे, आशा शिंदे, गीताबाई शेळकंदे,मंगल मुंढे, हे सुद्धा उपस्थित होते. याप्रसंगी बालकवींना शुभेच्छा देण्यासाठी बाळासाहेब लांघी(अध्यक्ष,शिक्षक समिती, पुणे जिल्हा),पोपट राक्षे (अध्यक्ष,आर. पी. आय. जुन्नर), विकास राऊत (सामजिक कार्यकर्ते) सुभाष जगताप, कानिफनाथ लांडे, पोपट मुंढे, तुकाराम लांघी, दिनकर जगताप, उपस्थित होते. निसर्गाची शाळा काव्यसंग्रह लेण्याद्री प्रकाशनतर्फे तयार करण्यात आला आहे . शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षाचा आनंद साजरा करत, शाळेचा ७५वा वाढदिवस मान्यवर अतिथींच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी चित्रकार प्रा. सुरेश डुंबरे यांनी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रकाशन समारंभात धनश्री पवार, कुणाल शेळके, मयूर पारधी, ज्ञानेश्वरी शेळके या बालकवींनी आपले मनोगत व्यक्त करत आपल्या कविताही सादर केल्या व उपस्थितांची मने जिंकून घेतली. पं. स. जुन्नरचे गटविकास अधिकारी विठ्ठलराव भोईर यांनी आपल्या मनोगतात शाळेतील या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले .या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन मढ केंद्राचे केंद्रप्रमुख साहेबराव मांडवे यांनी केले. निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या करंजाळे शाळेच्या मैदानात सुंदर मंडप उभारण्यासाठी नंदकिशोर जगताप यांचे सौजन्य लाभले. शाळा व्यवस्थापन समिती आणि करंजाळे गावातील ग्रामस्थांनी सहकार्य करून कार्यक्रमाची शोभा द्विगुणीत केली होती. तर या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन उत्तम सदाकाळ यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक नामदेव मुठे व शिक्षिका सरला दिवटे यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेक जबाबदाऱ्या स्वीकारून त्या यशस्वीरीत्या पार पाडल्या. कार्यक्रमाचे नेटके संयोजन व आभार प्रदर्शनाचे काम नंदकुमार साबळे यांनी केले.

  • "मोठं होण्याची किंमत: यशस्वी लोकांचा अंतहीन संघर्ष" - डॉ प्रतिक मुणगेकर

    मोठ्या माणसांना नेहमी त्रास का सहन करावा लागतो? एक कटू सत्य आणि उघड्या डोळ्यांनी पाहण्याची गरज. मोठं होणं म्हणजे केवळ यश, संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवणं नाही, तर एका अखंड संघर्षाला सामोरं जाणं आहे. लहानसहान लोकं चुकतात, पडतात आणि पुन्हा उभं राहतात, पण मोठ्या व्यक्तींच्या वाट्याला मात्र प्रत्येक चूक ही त्यांच्या पतनाचा प्रारंभ मानली जाते. का? कारण समाजाला मोठ्या माणसांचं अस्तित्व मान्यच नसतं. त्यांच्यावर प्रेम करणारे कमी आणि त्यांना खाली खेचणारे जास्त असतात. समाजाला संघर्ष आवडतो, पण यश स्वीकारायला जड जातं. जेव्हा एखादी व्यक्ती संघर्ष करत असते, तेव्हा समाज तिच्यासोबत असतो, सहानुभूती दाखवतो. पण तीच व्यक्ती यशस्वी झाली की समाजाची नजर बदलते. तेच लोक ज्यांनी प्रोत्साहन दिलं होतं, आता तिच्या यशाला ‘संधीचं भांडवल’ म्हणू लागतात. लोकांना संघर्ष पाहायला आवडतो, पण कोणीतरी त्या संघर्षातून वर येऊन मोठं झालं, हे त्यांना पचनी पडत नाही. मोठ्या लोकांना गृहीत धरलं जातं. यशस्वी माणसाला कधीही ‘मानव’ म्हणून पाहिलं जात नाही. त्याच्याकडून सतत आदर्श वर्तनाची अपेक्षा केली जाते. सामान्य माणूस चिडला, रागावला, थकला तरी त्याला समजून घेतलं जातं, पण मोठ्या व्यक्तीनं जर चुकूनही तसं केलं तर त्याला कठोर न्याय दिला जातो. त्याची भावनाही नाकारली जाते, कारण समाजाला वाटतं की मोठ्या माणसांना दुखावण्याचा, थकण्याचा किंवा हार मानण्याचा अधिकार नाही! सत्य बोलणाऱ्यांना जास्त त्रास होतो. मोठे लोक खोट्या दिखाव्याऐवजी सत्य सांगतात, आणि हीच गोष्ट समाजाला त्रासदायक वाटते. कोणीतरी सत्य उघड करत असेल, चुकीला विरोध करत असेल, तर तो समाजाच्या सोयीच्या चौकटीत बसत नाही. म्हणूनच असे लोक नेहमी अडचणीत येतात. इतिहास साक्षी आहे—सत्य सांगणाऱ्यांची नेहमीच परीक्षा घेतली जाते. संकटे वाढली की शक्तीही वाढते, पण त्याची किंमत मोजावी लागते. मोठ्या व्यक्तींना सतत कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं. त्यांना विचारायचं झालं तरी कुणाला विचारायचं? बोलायचं झालं तरी कुणाशी बोलायचं? कारण ज्या क्षणी ते आपली व्यथा उघड करतात, त्याक्षणी समाज त्यांच्यात कमजोरी शोधतो. त्यामुळे मोठी माणसं आतून खचतात, पण बाहेरून कठीण बनतात. समाजाला त्यांचा आत्मविश्वास दिसतो, पण त्यामागचा एकाकीपणा कोणीच पाहत नाही. विश्वासघात ही अपरिहार्य गोष्ट असते. मोठ्या लोकांनी नेहमीच हा कटू अनुभव घेतलेला असतो—जेव्हा यश लहानसं असतं, तेव्हा आपलेच लोक आपल्यासोबत असतात, पण जसा आपण मोठे होतो, तसतसे हेच लोक आपल्या विरोधात जातात. स्वार्थासाठी नाती बदलतात, मैत्री बदलते, आणि एक दिवस मोठी व्यक्ती स्वतःच्या सावलीशिवाय एकटी उरते. मोठ्या लोकांचं दु:ख कोणी समजून घेत नाही. लोकांना वाटतं की मोठ्या व्यक्तींना कोणत्याही गोष्टीची चिंता नसते—त्यांच्याकडे पैसा आहे, नाव आहे, यश आहे. पण कोणीतरी मोठं होण्यामागे त्याच्या झगड्यांचं प्रमाण अधिक असतं. झोपेचे तास कमी असतात, मनःशांती हरवलेली असते, आणि सतत काहीतरी गमावण्याची भीती असते. लोकांना त्यांचा वैभवशाली चेहरा दिसतो, पण त्या चेहऱ्यामागे असलेल्या मानसिक तणावाची जाणीव होत नाही. मोठ्या माणसांनी काय करावं? 1. समाजाला बदलता येणार नाही, पण स्वतःला मजबूत करता येईल – लोक काय म्हणतील, याचा विचार करणं बंद करा. 2. स्वतःच्या माणसांना ओळखा – प्रत्येकजण तुमचा मित्र नसतो. जे खऱ्या संकटाच्या काळात सोबत राहतात, तेच खरे आपले. 3. स्वतःच्या कष्टावर श्रद्धा ठेवा – यशावर इतर लोक हक्क सांगतील, पण संघर्ष तुमचाच असतो. 4. स्वतःला वेळ द्या – पैसा, प्रसिद्धी, सत्ता यांच्यापेक्षा मानसिक शांती अधिक मौल्यवान आहे. मोठी स्वप्नं पाहणाऱ्या आणि ती पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना कायम संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष कधीही संपत नाही. जितके उंच जाल, तितकी वारे जास्त झोके देतील. पण ज्यांना या झोक्यांची भीती वाटत नाही, तेच शेवटी इतिहास घडवतात. म्हणून मोठी स्वप्नं बघा, संघर्षाला सामोरे जा, आणि कोणाच्याही टीकेला न जुमानता स्वतःच्या मार्गावर चालत राहा. "कारण समाजाने कितीही विरोध केला तरी, सूर्य कधी प्रकाश देणं थांबवत नाही!"

  • हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये उत्साहात ‘मराठी राजभाषा दिवस’ साजरा

    कासार आंबोली – हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल येथे २७ फेब्रुवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात ‘मराठी राजभाषा दिवस’  साजरा करण्यात आला. मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा दिवस दरवर्षी मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी स्वागत नृत्य, भाषणे, बडबडगीते, कविता, नाटक, लावणी, भारूड, लोकनृत्य आणि पारंपरिक वेशभूषा सादरीकरण यांसारख्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. तसेच, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सौ. रेणू पाटील यांनी मार्गदर्शन केले, तर सूत्रसंचालन सौ. प्राजक्ता आमराळे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन शाळेतील Yellow हाऊस तर्फे करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. कृष्णा भिलारे, सचिव सौ. संगीता भिलारे, संचालक श्री. कुणाल भिलारे, व्यवस्थापिका सौ. यशस्विनी भिलारे आणि प्राचार्या डॉ. सौ. रेणू पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या भव्य आयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण झाली असून, मराठी संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित झाले.

  • कीर्तन: रुपेरी पडद्यावर इतिहास घडवणारा भव्य चित्रपट! दिग्दर्शक अतुल जगदाळे लवकरच घोषणा करण्याच्या तयारीत!

    मुंबई, (प्रतिनिधी) :  ग्लॅमरस आणि मनोरंजनप्रधान विषयांपासून वेगळ्या वाटेवरचा एक अनोखा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे! मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक अतुल जगदाळे यांच्या ‘कीर्तन’ या आगामी चित्रपटाविषयी सध्या चित्रपटसृष्टीत विशेष चर्चा सुरु असल्याचे ऐकिवात येत आहे. महाराष्ट्राच्या संतपरंपरेवर आधारित हा भव्यदिव्य चित्रपट प्रेक्षकांना वेगळ्या विश्वात घेऊन जाईल असे जाणकार सांगत आहेत. या चित्रपटाची निर्मिती ‘अतुल जगदाळे प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड’च्या बॅनरखाली होत असून, तो आतापासूनच उत्कंठतेचा विषय ठरला आहे.  अध्यात्म – एक नवा प्रयोग! ‘कीर्तन’ हा चित्रपट केवळ संतपरंपरेवर आधारित धार्मिक चित्रपट नसून, त्याला एक भव्य दृष्टीकोन देण्यात आला आहे. कीर्तनकारांच्या जीवनावर प्रकाश टाकत, त्यामधील संघर्ष आणि समाजप्रबोधनाचे महत्त्व उलगडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून होणार आहे. भव्य सेट्स, अप्रतिम छायांकन आणि दमदार कथा यामुळे हा चित्रपट केवळ इतिहास नव्हे, तर समकालीन रसिकांसाठीही एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव असणार आहे.  कलावंत कोण असतील? संगीत कोणाचे? – उत्सुकता वाढली! 'कीर्तन' म्हटलं कि ओघाने संगीत-लोकसंगीत आलंच. त्यामळे चित्रपटसृष्टीत सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला प्रश्न म्हणजे ‘कीर्तन’ चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची धुरा कोणाच्या हाती असणार? या विषयाला अत्यंत प्रभावी आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या सुरांची नस जाणणाऱ्या प्रतिभावंत संगीतकारांपैकी नेमकी कोणाकडे ही धुरा सुपूर्द होणार? कीर्तनात कोणत्या गायकांचा स्वर तल्लीन करणार? या चर्चांना उधाण आले आहे. तसेच या भव्य चित्रपटात कोणकोणत्या दिग्गज कलावंतांची वर्णी लागणार आहे याविषयीसुद्धा कमालीचे औत्सुक्य आहे. निर्माते-दिग्दर्शक अतुल जगदाळे यांनी यासंदर्भात गुप्तता राखली असली, तरी ‘लवकरच मोठी घोषणा होईल’ असे त्यांनी संकेत दिले आहेत. त्यामुळे चित्रपटप्रेमींच्या उत्कंठेला आणखी उधाण आले आहे.  ‘गणवेश’च्या यशानंतर नवा प्रयोग! ‘गणवेश’ या सामाजिक आशयाच्या चित्रपटानंतर तीन- चार वर्षांपासून अतुल जगदाळे यांनी एका भव्य दिव्य हिंदी चित्रपटावर काम सुरु केले आहे. त्यासोबत त्यांनी आपल्या मातृभाषेतील कलाकृतीलाही विशेष प्राधान्य देत मराठी माणसाला प्रिय असलेले 'कीर्तन' भव्य रुपेरी पडद्यावर सादर करण्याचा प्रयोग करत आहेत. अतुल जगदाळे यांना कलावंत तंत्रज्ञ निवडीची अचूक जाण आहे. त्यांच्या ‘गणवेश’ मध्ये दिलीप प्रभावळकर, मुक्ता बर्वे, किशोर कदम, स्मिता तांबे यांसारख्या दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे ‘कीर्तन’ मध्ये कोणती स्टारकास्ट असणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

9561398225

  • Facebook
  • Instagram

©2021 by Stay Featured. Proudly Created by Buzzer Media & Advertising

bottom of page