शहापूर येथील सोनुभाऊ बसवंत महाविद्यालयात ‘Film Making पाठशाळा’ कार्यशाळेचे आयोजन
- Team Stay Featured

- 5 days ago
- 2 min read
शहापूर येथील सोनुभाऊ बसवंत महाविद्यालयात IQAC, बँकिंग अँड इन्शुरन्स तसेच अकाउंटिंग अँड फायनान्स विभागांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी ‘चित्रपट निर्मिती (Film Making)’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये माध्यम साक्षरता, सर्जनशीलता तसेच डिजिटल युगातील दृकश्राव्य माध्यमांचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. अनिल सिंह यांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी आजच्या स्पर्धात्मक व डिजिटल युगात मीडिया, फिल्म मेकिंग, जाहिरात व कंटेंट निर्मिती या क्षेत्रांचे वाढते महत्त्व स्पष्ट केले. अशा कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरतात. चित्रपट निर्मिती प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, कल्पकता, तांत्रिक कौशल्ये, संघभावना, नेतृत्वगुण व संवादकौशल्य विकसित होते. तसेच अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी भविष्यातील करिअरसाठी अधिक सक्षम होतात व आत्मविश्वासाने आपले विचार मांडण्याची प्रेरणा मिळते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ‘Smaster_Ji Production’ चे संस्थापक श्री. सुनील वाघमारे उपस्थित होते. त्यांनी ‘Film Making पाठशाळा’ या संकल्पनेचे सखोल व सोप्या भाषेत स्पष्टीकरण केले. व्हिडिओ निर्मितीची प्रक्रिया, कॅमेऱ्याचे प्रकार, प्रकाशयोजना, कॅमेरा अँगल्स, स्क्रिप्ट लेखन, दिग्दर्शन तसेच संपादन (एडिटिंग) याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमांची तांत्रिक व कलात्मक बाजू प्रभावीपणे समजावून सांगितली.

कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी मीडिया व फिल्म क्षेत्रातील करिअर संधींबाबत विविध प्रश्न विचारले. त्यास श्री. सुनील वाघमारे यांनी समर्पक उत्तरे देत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून नव्या कौशल्यांची ओळख झाली, अशी भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संतोष गायकवाड, IQAC समन्वयक प्रो. डॉ. एस. एस. वाघमोडे, बँकिंग अँड इन्शुरन्स विभागप्रमुख, अकाउंटिंग अँड फायनान्स विभागप्रमुख प्रा. यास्मिन शेख, प्रा. राजेंद्र दिवेकर, प्रा. दर्शना निचिते, प्रा. नयना जाधव, प्रा. निशा वर्मा तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राजेंद्र दिवेकर यांनी केले, सूत्रसंचालन द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी तन्वी वारघाडे हिने केले तर आभारप्रदर्शन प्रा. यास्मिन शेख यांनी केले.
ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली असून अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे महाविद्यालयाची शैक्षणिक व सहशैक्षणिक गुणवत्ता अधिक बळकट होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.






Comments