ध्वनी प्रदूषणाविरोधात जनजागृतीचा सूर समता विद्यालय, उरुळी देवाची येथे निसर्ग सृष्टी वेल्फेअर फाउंडेशनची प्रभावी कार्यशाळा
- Team Stay Featured

- Jan 11
- 2 min read
उरुळी देवाची (ता. हवेली, जि. पुणे) — साने गुरुजी शिक्षण संस्थेचे समता विद्यालय, उरुळी देवाची येथे दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत निसर्ग सृष्टी वेल्फेअर फाउंडेशन यांच्या वतीने ध्वनी प्रदूषण जनजागृती कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला निसर्ग सृष्टी वेल्फेअर फाउंडेशनचे व्यवस्थापक श्री. राजेंद्र कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या पर्यावरण संवर्धनविषयक कार्याचा आढावा घेतला. ध्वनी प्रदूषणामुळे मानवी आरोग्य, विद्यार्थी जीवन आणि समाजावर होणाऱ्या परिणामांवर त्यांनी प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी डॉ. गरिमा कवठेकर, संस्थापक व संचालिका यांचा परिचय करून देत, नववर्षात संस्थेच्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.

कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शन डॉ. गरिमा कवठेकर यांनी केले. त्यांनी ध्वनी प्रदूषणासंदर्भातील मूलभूत संकल्पना, डेसिबल म्हणजे काय, डेसिबल मीटरचा वापर, ध्वनी प्रदूषणाची कारणे व त्याचे दुष्परिणाम यांची माहिती प्रत्यक्ष उदाहरणांसह दिली. टाळ्या कशा वाजवाव्यात, शिट्टी न वाजवता बोटांच्या साहाय्याने कमी आवाज कसा निर्माण करता येतो, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक (डेमो) सादर करून विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात ध्वनी प्रदूषण कसे टाळता येईल, याचे प्रभावी मार्गदर्शन केले. तसेच ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात व कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, हेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यशाळेसाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी दिलेले उत्स्फूर्त सहकार्य उल्लेखनीय ठरले. विद्यार्थ्यांचा सहभाग व प्रतिसाद पाहता हा उपक्रम यशस्वी ठरल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. रामचंद्र गाढवे यांनी डॉ. गरिमा कवठेकर यांच्या कार्याची प्रशंसा करत, समाजात ध्वनी प्रदूषणाविरोधात जनजागृती घडवून आणण्यासाठी अशा उपक्रमांची अत्यंत आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमास श्री. ऋषिकांत भोसले (पर्यवेक्षक), श्री. नाना झाबरे, श्री. शरद मोरे, महिला शिक्षिका, सेवक वर्गातील श्री. भोकसे, श्री. मेमाणे, श्री. टेले, शाळेचे मुख्याध्यापक श्री. रामचंद्र गाढवे, तसेच निसर्ग सृष्टी वेल्फेअर फाउंडेशनचे सदस्य श्री. गणपती खोत उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी श्री. सदानंद नरुटे (कला शिक्षक) यांनी आभार प्रदर्शन केले. त्यानंतर मुख्याध्यापक श्री. रामचंद्र गाढवे व पर्यवेक्षक श्री. ऋषिकांत भोसले यांच्या हस्ते निसर्ग सृष्टी वेल्फेअर फाउंडेशनच्या टीम सदस्यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. भविष्यातही अशा प्रकारच्या जनजागृती कार्यक्रमांसाठी संस्थेला पुनःपुन्हा आमंत्रित करण्याची इच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली.
या यशस्वी कार्यशाळेत सुमारे ९०० विद्यार्थी तसेच २० शिक्षक व सेवक वर्ग सहभागी झाले होते. सदर ध्वनी प्रदूषण जनजागृती कार्यशाळा शाळेचे मुख्याध्यापक श्री. रामचंद्र गाढवे यांच्या परवानगीमुळेच यशस्वीपणे पार पडली.






Comments