सर्वसाधरणपणे सामान्य माणूस हा आपल्या डोळ्यांना दिसतं त्यावर जास्त विश्वास ठेवतो.आपल्याला जे दिसतं आहे, त्यापलीकडे जाऊन जग कसं आहे हे फार कमी लोक बघतात.वीरेन पवार यांनी जगातील १९ देशांची भ्रमंती करून आपल्या पुस्तकातून तेच वेगळेपण मांडले आहे. यामुळे दिसण्या पलिकडे सुद्धा संस्कृती, इतिहास आहे हा विचार आपल्या मनात या पुस्तकामुळे येईल असे मत पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
उन्मेष प्रकाशन च्या वतीने प्रकाशित लेखक वीरेन पवार यांच्या "१९ देश ४६० दिवस" पुस्तकाचा प्रकाशन समारंभ कमिन्स सभागृह, पत्रकार भवन येथे त्यांच्या हस्ते पार पडला यावेळी मोहोळ बोलत होते.याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्रसिद्ध क्रीडा वैद्यक तज्ज्ञ डॉ हिमांशू वझे, लेखक वीरेन पवार, विशाखा सप्रे, उन्मेष प्रकाशनच्या मेधा राजहंस आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, '१९ देश ४६० दिवस' या पुस्तकात पवार यांनी टिपिकल शहरे, पर्यटस्थळांना भेटी न देता वेगळ्या मार्गाने जाऊन देश समजून घेत प्रत्येक देशातील समाजमनाचे प्रतिबिंब आपल्या लेखनातून उतरविले आहे.
डॉ. हिमांशू वझे म्हणाले की, ज्ञाता मधून अज्ञाता मध्ये प्रवास म्हणजे नेमके काय असेल याचा उलगडा विरेनं पवार यांच्या या पुस्तकांतून होतो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सोलो प्रवासासाठी साहस, संयम आणि जे येईल ते स्वीकारण्याची क्षमता लागते, आपल्यापेक्षा वेगळ्या व्यक्तींशी जुळवून घेण्याची मानसिकता लागते, पवार यांनी ती दाखवल्यामुळे त्यांचा प्रवास आणि हे पुस्तक घडू शकले आहे.
सुप्रसिध्द निवेदक मिलिंद कुलकर्णी यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत बोलताना वीरेन पवार यांनी सांगितले की, घरच्यांनी लहानपापासूनच दिलेल्या शिकवणी मुळेच हा प्रवास शक्य झाला. लहानपणी आम्ही गावी जायचो त्यातून प्रवासाची आवड निर्माण झाली, प्रताप गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातून आम्ही अनेकदा गडावर गेलो, त्यात मजा यायची पुढे आर्किटेक्चर चे शिक्षण घेत असताना स्टडी टूरच्या निमित्ताने फिरणे व्हायला लागले आणि त्यातून समजले की आपल्याला हे आवडत आहे, यामुळे संधी मिळाली तर एकट्याने प्रवास करावा असा विचार मनात आला, तो ९ वर्षे नोकरी केल्यानंतर पूर्णत्वास नेता आला. हा प्रवास सुरू करण्यापूर्वी जी काही तयारी केली तो फक्त एक टप्पा होता, खरा प्रवास सुरू झाल्यावर समजले की कोणत्याही परस्थितीला सामोरे जाण्याची तयारी असणे हेच सर्वात महत्वाचं आहे.
यावेळी प्रकाशक मेधा राजहंस, विशाखा सप्रे यांनीही मनोगत व्यक्त केले.
Comments