“दाजी काका : प्रेम, प्रेरणा आणि आठवणींचा अमूल्य ठेवा”- डॉ प्रतिक मुणगेकर
- Team Stay Featured
- Jun 7
- 2 min read
दाजी काका... तुमचं जाणं अंतःकरणाचा ठाव घेऊन गेलं..
माझी आणि दाजी काकांची पहिली भेट 2011 साली झाली, जेव्हा त्यांनी आमच्या शाळेला ‘विवेकानंद पुरस्कार’ देण्यासाठी भेट दिली होती. त्याच वर्षी सलग तीन दिवस त्यांनी घेतलेली ‘महाभारत’वरील व्याख्यानमालिका ऐकण्याचा योग आला. त्या शब्दांनी श्रोत्यांच्या मनामध्ये जणू मंत्रच फुंकला होता—अप्रतिम, अवर्णनीय अनुभव!
मग जवळजवळ आठ वर्षांनी, नंदिनी ताईंमुळे पुन्हा एकदा दाजी काकांच्या सान्निध्यात येण्याचा योग आला. त्या भेटीनंतर मात्र अनेकदा त्यांच्या सहवासाचा, ज्ञानस्पर्शाचा आणि मायेच्या उबदार सावलीचा अनुभव घ्यायला मिळाला. हे माझं भाग्यच म्हणावं लागेल.

दाजी काकांनी माझ्या एका पुस्तकासाठी प्रस्तावनाही लिहिली. माझ्या प्रत्येक पुस्तकाला त्यांनी आनंदाने आणि पूर्ण उत्साहाने स्वीकारलं, कौतुक केलं, आणि भरभरून आशीर्वाद दिला. त्यांच्या घरी अनेकदा तासनतास बसून त्यांच्या विविध विषयांवरील चिंतन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विचारांची खोली ऐकण्याचा योग आला – किती भाग्यवान आहे मी!
ठाण्यात एकदा त्यांच्या व्याख्यानाला गेलो होतो. मी त्यांच्या साठी एक भेटवस्तू आणली होती. व्यासपीठावर जाऊन त्यांना ती दिली आणि नमस्कार केला. तेव्हा त्यांनी सर्वांसमोर माझं कौतुक करत, “हा माझा शिष्य आहे,” असं जाहीर केलं. त्या क्षणात जो आनंद मिळाला, ती ऊर्जा, तो गौरव – तो क्षण कायमचा हृदयात कोरला गेला.
केवळ चार दिवसांपूर्वी मी फिलिपिन्समध्ये कार्यसंदर्भात होतो. तेव्हा माझा जिवलग मित्र पियूष याचा व्हिडीओ कॉल आला. त्यातून कळलं की दाजी काकांची तब्येत थोडी नरम आहे. पण अशा अवस्थेतही त्यांनी माझी आठवण काढली होती, विचारलं होतं – “प्रतिक कधी येणार?” “तो आता कायमचा फिलिपिन्समध्येच राहणार का?” हे प्रेम, ही आपुलकी, ही काळजी… शब्द अपुरे पडतात हे व्यक्त करायला.
त्यांनी मला भरभरून दिलं – प्रेम, मार्गदर्शन, आशीर्वाद… आणि मी त्यांच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकत नाही.
किती आठवणी, किती प्रसंग… सगळं लिहावं तर शब्दही थकतील.
दाजी काका, माझा साष्टांग नमस्कार तुम्हाला. तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, कायम राहतील याची खात्री आहे.
आणि हो, तुम्ही सांगितलं होतं – “मराठीत पुस्तक लिही…” ती इच्छा मी पूर्ण करत आहे. लवकरच ते पुस्तक प्रकाशित होणार आहे… आणि ते संपूर्णपणे तुम्हाला समर्पित करतो.
तुमचं प्रेम, शिकवण आणि आशीर्वाद – आयुष्यभराचं प्रेरणास्थान.
इति लेखनसीमा
(एक स्नेहबंध, एक ऋण, एक अमूल्य ठेवा...)
-प्रतिक
दाजी पणशीकर ह्यांच्याविषयी
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वैचारिक विश्वात अढळ स्थान असलेले ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि वक्ते दाजी पणशीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांनी विविध वृत्तपत्रांमधून लिहिलेल्या लेखमालांनी महाराष्ट्राला समृद्ध वैचारिक ठेवा दिला. 'महाभारत एक सुडाचा प्रवास', 'कर्ण खरा कोण होता?', 'कथामृतम', 'कणिकनिती', 'स्तोत्र गंगा' (शंकराचार्यांच्या स्तोत्रांवर आधारित, दोन भाग), 'अपरिचित रामायण' (पाच भाग), 'गानसरस्वती किशोरी आमोणकर - आदिशक्तीचा धन्योद्गार' यांसारख्या त्यांच्या ग्रंथांच्या 30 हून अधिक आवृत्त्या प्रकाशित झाल्या. विषयाचा सखोल व्यासंग, चिंतनशीलता, स्पष्ट भूमिका आणि परखड विवेचन ही त्यांच्या लेखन आणि वक्तृत्वाची ओळख होती. त्यांचे थोरले बंधू प्रभाकर पणशीकर यांच्या 'नाट्यसंपदा' नाट्यसंस्थेचे व्यवस्थापक म्हणून दाजी पणशीकर यांचा मराठी साहित्य, संगीत, नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांशी घनिष्ठ संबंध आला. गेल्या 50 वर्षांतील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचे साक्षीदार असलेले हे महान व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या निधनाने मराठी सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
Comments