top of page

जन्मोत्सव शिवरायांचा सोहळा मराठी अस्मितेचा : हेरिटेज इंटरनॅशनल स्कुल ,कासार आंबोली

Writer: Neel DeshpandeNeel Deshpande

जन्मोत्सव शिवरायांचा सोहळा मराठी अस्मितेचा

“प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय...”

असा जयघोष करत हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल कासार आंबोली येथे आज मोठ्या जल्लोषात शिवजन्मोत्सव म्हणजे शिवजयंती साजरी करण्यात आली. या वर्षाची कार्यक्रमाची मुख्य संकल्पना शिवराज्याभिषेक सोहळा ही होती.


“प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते.” राजमुद्रेवर कोरलेल्या या शब्दांनी महाराजांचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणूनच शाळेत महाराजांचे स्मरण करण्यासाठी त्यांच्या कार्याची थोरवी जाणण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


शिवजयंती उत्सवात खालील सादरीकरणांचा समावेश होता: कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमात सादर होणारे विविध सादरीकरण रुपी पुष्पांनी जणू एक माळच गुंफण्यात आली.


या माळ मार्फत महाराजांचा जीवनकाल नाट्यरुपात अमृता शिंदे इ. 9वी व वृद्धी राजगुरू इ. 6वी. या विद्यार्थिनींनी सादरीकरण केले. शिवरायांचा पाळणा या नृत्यातून शिवरायांचा जन्मोत्सव दाखवण्यात आला. लाठीकाठी या नृत्यामार्फत शिवरायांचे युद्ध कौशल्यांचे प्रदर्शन करण्यात आले त्यानंतर शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा नृत्य व नाटकामार्फत दाखविण्यात आला.



राज्याभिषेकासाठी मासाहेब जिजाऊ व राजा छत्रपती यांचे अश्वारूढ होऊन आगमन झाले. व राज्याभिषेक सोहळा दाखविण्यात आला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक शपथ विधी दाखवण्यात आला. त्यानंतर इयत्ता सहावीच्या हिमाक्षी बीटे हिने आपल्या भाषणामार्फत महाराजांची थोरवी गायली.


3री ते 5वी व इयत्ता 6वी च्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरण केले त्यातून शिवाजी महाराजांचे शौर्य साहस व पराक्रम दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच इयत्ता 7वी चे विद्यार्थी नील देवजीरकर आणि अमेय भोसले या विद्यार्थ्यांनी महाराजांवरती एक सुंदर असं रॅप गायले. इयत्ता पहिली व दुसरी अनुक्रमे स्पृहा हिमगिरे शरण्या व राजवीर पाटील यांनी महाराजांची माहिती सांगणारे कथाकथन केले.

तसेच शाळेच्या व्यवस्थापकीय संचालक सौ. यशस्विनी भिलारे यांनी महाराजांविषयी विचार प्रकट केले. आपल्या भाषणातून त्यांनी विद्यार्थ्यांना महाराजांविषयी माहिती मिळवण्यासाठी जास्तीत जास्त वाचन करण्यासाठी आव्हान केले. विद्यार्थ्यांना महाराजांच्या चरित्राविषयी, महाराजांच्या कार्याविषयी आणि गड किल्ले यांची माहिती व्हावी म्हणून प्रश्नमंजुष्याचे आयोजन करण्यात आले होते.



कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक शिवगर्जनेने आसमंत दुमदुमला. कार्यक्रमाचे शेवटी श्री कुणाल भिलारे यांनी मुलांचे कौतुक केले. शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या डॉक्टर रेणू पाटील यांनी मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सुषमा पाटील यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शाळेतील Yellow हाऊस ने केले होते. कार्यक्रम सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचा सहभागने अतिशय सुंदर रित्या पार पडला.


शिवजयंती निमित्त शाळेत एक आठवडा आधीच विद्यार्थ्यांना विविध ऍक्टिव्हिटीज देण्यात आल्या होत्या जसे की निबंध लेखन, पोस्टर तयार करणे, शिवगर्जना पाठांतर, शिवमुद्रा लेखन व पाठांतर, शिवरायांची वंशावळ लेखन, शिवरायांचे कथांचे वाचन व वर्गात सादरीकरण अशा अनेक ऍक्टिव्हिटी विद्यार्थ्यांनी आठवडाभरात पूर्ण केल्या.

शिवजयंतीसाठी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच व विद्यमान सदस्य कासार आंबोली श्री उमेश सुतार उपस्थित होते. तसेच शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री कृष्णा भिलारे, संस्थापक सचिव सौ संगीता भिलारे, व्यवस्थापकीय संचालक श्री कुणाल भिलारे, समाजसेवक गणेशभाऊ भिलारे ,शाळेच्या प्राचार्या डॉ. रेणू पाटील उपस्थित होते.


छत्रपती शिवाजी महाराज की जय !

Comentarios


9561398225

  • Facebook
  • Instagram

©2021 by Stay Featured. Proudly Created by Buzzer Media & Advertising

bottom of page